वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल, उष्णतेत प्रचंड वाढ : मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमान 35 अंशांवर
खानापूर : मार्चच्या सुरुवातीलाच तापमान 35 अंशांपर्यंत पोहचल्याने खानापूर तालुक्यातील नागरिक उन्हाच्या चटक्यांमुळे हैराण झाले आहेत. शिवाय उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी लोक विविध उपाययोजना करत आहेत. तसेच शहरातील शितपेयाच्या दुकानांत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसेच फळविक्रेत्यांच्याही स्टॉललाही गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, वळीव पावसाच्या प्रतीक्षेत लोक आहेत. यावर्षीही वळिवाचा पाऊस होईल की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी पुढील चार महिने उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.
दरवर्षी फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून तापमानात हळूहळू वाढ होते. यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उसाचा रस, ज्युस, सरबत, ताक, लसी व कोल्ड्रींक विक्री करणाऱ्या दुकानांत गर्दी वाढू लागली आहे. सकाळी 10 ते रात्री उशिरापर्यंत हातगाड्या कोल्ड्रींक हाऊस आणि रसवंतीगृहात कमालीची गर्दी दिसून येत आहे. तसेच लिंबू सोडा, कोकम, वाळा (खस), ऑरेंज, लेमन, सरबत व ज्युस विकणाऱ्या व्हॅनही जागोजागी दिसू लागल्या आहेत. शहरात काकडी, कलिंगड, द्राक्षे, टरबूजसह विविध फळांची लोक खरेदी करताना दिसत आहेत.
काही वर्षापूर्वी खानापूर तालुक्यात 30 ते 33 डिग्री तपमान झाले की वळिवाचा पाऊस हमखास होत होता. मात्र काही वर्षापासून पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने तालुक्याच्या तापमानातही वाढ झालेली आहे. तापमान 38 डिग्रीच्या वर गेल्यावरही वळिवाचा पाऊस होईना. यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमान 35 अंशापर्यंत गेले आहे. त्यामुळे उष्णतेच्या झळानी लोक हैराण झाले आहेत. यापूर्वी तालुक्यात उष्णतेचा परिणाम जाणवत नव्हता. मात्र अलीकडच्या काही वर्षात वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.
वळिवाच्या प्रतीक्षेत
मागीलवर्षी वळीव पाऊस झालाच नव्हता. त्यानंतर पावसाळ्यातही पावसाने साथ दिली नाही. त्यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांची पाणी पातळी झपाट्याने घटली आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढलेली आहे. तसेच मार्च महिना सुरू झाला तरी वळिवाने अद्याप हजेरी लावलेली नाही. उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी वळिवाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.









