शहरासह ग्रामीण भागात धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन, सरकारी कार्यालये ओस, मंदिरांतून भव्य गर्दी
खानापूर : अयोध्या येथे राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तालुक्यात सर्वत्र सणाचे वातावरण निर्माण झाले होते. गावोगावी ग्रामीण भागात भगव्या पताका, झेंडे, तोरण आणि रस्त्यावर रांगोळ्यांनी गाव सजवण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिरात पूजा, अर्चा सुरू करण्यात आल्या होत्या. दुपारी 12 वाजता मंदिरातून रामनाम जप, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, विष्णूसहस्त्रनाम यासह विविध पाठांचे वाचन मंदिरातून करण्यात आले. दुपारी 1.30 वाजता महाआरती करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आणि गावोगावी प्रसादाचे वितरण करण्यात आले. अयोध्या येथील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात आली होती. मंदिरावर विद्युतरोषणाई तसेच मंदिरासमोरील भागात भगव्या पताका, झेंडे, अंब्याची तोरणे, रामांचे मोठे कटआऊट्स उभारले होते. घराघरांवर भगवे झेंडे लावल्यामुळे संपूर्ण तालुक्यात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. युवावर्गातून राममूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह ओसंडून वाहत होता. युवावर्गातून प्रत्येकाच्या गळ्यात भगवे टॉवेल आणि डोक्यावर भगवी टोपी दिसून येत होती. महिलांनीही सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती. शहरातील महालक्ष्मी मंदिरात भव्य कटआऊट उभे करून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नदीघाटावरील राम मंदिरात आकर्षक पूजा केली होती. तसेच ज्ञानेश्वर मंदिर, बसवेश्वर मंदिर, चव्हाटा मंदिर, रवळनाथ मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, मऱ्याम्मा मंदिर, सातेरी माउली मंदिर, चौराशी मंदिर यासह इतर छोट्या मंदिरांतूनही सकाळपासूनच पूजाविधी सुरू होती. मंदिरात अभिषेक, पूजा झाल्यावर दुपारी 12 वा. श्री रामाचा नामजप सुरू होता. त्यानंतर हनुमान चालीसा, मारुती स्त्रोत्र पठण करून आरतीनंतर तीर्थप्रसादाचे वाटप केले.
तालुक्यात पूजाविधी, भजन
तालुक्यातील करंबळ, जळगे, चापगाव, कारलगा, कौंदल, नंदगड, हलशी, रुमेवाडी, हत्तरगुंजी, मोदेकोप, हब्बनहट्टी, नागुर्डा, गणेबैल, इदलहोंड, निडगल, बरगाव, तोपिनकट्टी, बिदरभावी, गर्लगुंजी, हारुरी, माडीगुंजी, कापोली, लोंढा येथे राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष पूजेचे आयोजन केले होते.
हलशी नृसिंह देवस्थानात विशेष पूजा
हलशी येथील भुवराह नृसिंह देवस्थानात विशेष पूजेचे आयोजन केले होते. माचीगड येथील श्री सुब्रम्हण्य मंदिरातही विशेष पूजचे आयोजन केले होते. तर असोगा रामलिंग देवस्थानात पूजा, प्रसाद वाटप झाले. सर्वच गावांत महाप्रसादाचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील मुले, युवावर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन मंदिरात भजन, पूजन व प्रसादाचा लाभ घेतला. काही ठिकाणी बालचमूनी रामाच्या वेशभूषेत नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यालये ओस
राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून खानापूर येथील राम मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले होते. सायंकाळी 4.30 वाजता गीतरामायण निवडक गाणी आणि रामायणावर आधारीत गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावोगावी कार्यक्रम आयोजित केल्याने सोमवारी ग्रामीण भागातून शहरात लोकांची वर्दळ एकदम कमी होती. त्यामुळे सोमवार असूनदेखील सर्व सरकारी कार्यालये माणसांविना ओस पडली होती. एकाही सरकारी कार्यालयात लोकांची वर्दळच नव्हती. त्यामुळे सरकारी कार्यालयात अधिकारीही कामाविना बसून होते. महालक्ष्मी मंदिरात भाजपच्यावतीने राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी 11 ते 12.30 पर्यंत श्री राम जप, हनुमान चालीसा, रामचरित मानस यांचे पठण केले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, तालुका जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप युवा कार्यकर्ते पंडित ओगले यांची भाषणे झाली. यानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली. महालक्ष्मी मंदिर परिसराला श्री राम चौक असे नामकरण जाहीर करण्यात आले.









