पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या खडकी परिसरातील त्यागी शाळेसमोर सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक टोळके गाणे लावून नाचत होते. त्यांच्यात स्पिकरवर कोणते गाणे लावयाचे या कारणावरुन वाद सुरू होता. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी आणि स्पीकर बंद करण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
सुमित सुभाष मिश्रा, रसल ऍल्वीस जॉर्स, वृषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (23) व सिध्दार्थ महादेव लोहान (24) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन समरत बेदगुडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक वाचा : आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक बेदगुडे हे सदर परिसरात रात्रगस्त घालत होते. त्यावेळी खडकी परिसरात त्यागी शाळेसमोरच्या रस्त्यावर एक टोळके स्पिकरवर गाणे लावून नाचत होते. बेदगुड यांनी या युवकांना स्पिकर बंद करा असे सांगितले असता, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा बेदगुड यांनी स्वत: स्पीकर बंद केला. त्यावेळी या युवकांनी बेदगुड यांचे सहकारी पोलीस शिपाई जाधव यांची कॉलर पकडून आम्ही इथले कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पोलीस असला तरी आमचे काही वाकडे करणार नाही, असे म्हणून तक्रारदार बेदगुड व पोलीस चालक जाधव यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या ताब्यातील सरकारी वाहनाची गाडीची चावी काढून घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस मगदुम करत आहे.









