आमदार प्रवीण आर्लेकर यांचे जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांना आदेश
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बुधवारी कासरवर्णे आणि हणखणे भागात जाऊन तिलारी पाणी प्रकल्पाच्या कालव्याची पाहणी केली. रानटी जनावरे, पाळीव प्राणी आणि लोकांना कालव्यापासून संरक्षण मिळावे यासाठी कालव्याला संरक्षकभिंत, कुंपण घालण्यात यावे, असे आदेश जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांना आमदार आर्लेकर यांनी दिले.
कासरवर्णे आणि हणखणे भागात तिलारी कालव्याच्या कडेला संरक्षकभिंत, कुंपण नाही. गेली अनेक वर्षे या भागातील लोकांनी कालव्याच्या कडेला उपाय योजना करण्याची मागणी केली होती. परंतु जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांनी लक्ष दिले नाही. या परिसरातील कालव्यात पाळीव प्राणी तसेच रानटी जनवारे पडून मृत्यू झाला आहे. एक अपघातात काही महिन्यापूर्वी एका नागरिकाच कालव्यात पडून मृत्यू झाला याची दखल आमदार आर्लेकर यांनी घेत कालव्याच्या कठाडय़ाला संरक्षण उभारण्याचे आदेश दिले.
कालव्याचे पाणी पेडणे तालुक्मयात विविध भागात पुरविले जाते. मात्र अनेक वेळा रानटी जनावरे पाणी पिण्यासाठी कालव्यात उतरतात त्याना पुन्हा कालव्यातून वर येता येत नाही परिणामी जीव गमवावा लागतो. काही महिन्यांपूर्वी याच कालव्यात गव्याचा कळप पडला होता त्यातील दोन गव्याचा मृत्यू झाला होता.
पाहणी केल्यानंतर आमदार आर्लेकर यांना विविध समस्या आढळून आल्या. काही भागात कालवा तुटलेला असून अनेक ठिकाणी पाणी वाया जात आहे. याबाबतही संबंधित अधिकाऱयांनी लक्ष घालून कालव्याची दुरुस्ती करावी, अशा सूचनाही अधिकाऱयांना केल्या.









