पीक घेण्यात 100 हून अधिक जणांचा सहभाग, लोलये – पैंगीणमधील जायांना अधिक मागणी, दरदिवशी खुटले जातात 5 ते 6 लाख कळे

अजित पैंगीणकर /काणकोण
साधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांपुरता मर्यादित असलेला जायांच्या कळय़ांचा व्यवहार काणकोण तालुक्यात काही कोटी रुपयांपर्यंत सध्या पोहोचलेला आहे. यंदा बरोबर हंगाम सुरू होण्याच्या वेळीच पावसाने जोर धरल्यामुळे काही प्रमाणात या पिकावर परिणाम झाल्याची माहिती या तालुक्यात जायांचे मळे पिकविणाऱया काही उत्पादकांनी दिली. या तालुक्यातील लोलये आणि पैंगीण पंचायत क्षेत्रांतील कळय़ांना अधिक मागणी असते.
जायांचे कळे हे सूर्योदयानंतरच खुटायला हवेत. त्यावेळी त्यांची पूर्ण वाढ झालेली असते. काही लोक पहाटे 3 किंवा 4 वा. कळे खुटायला जातात. त्या कळय़ांची व्यवस्थित वाढ होत नसते. त्यामुळे त्या कळय़ांना सुगंध येत नाही आणि संध्याकाळपर्यंत जायांच्या माळा काळय़ा पडतात. सूर्योदयानंतर खुटलेले कळे विक्रीसाठी ज्या ठिकाणी आणले जातात त्याच ठिकाणी बसून महिला त्यांच्या माळा बनवत असल्याचे चित्र विशेषतः माड्डीतळप परिसरात पाहायला मिळते.
काही वर्षांपूर्वी लोलये आणि पैंगीण या दोन पंचायतींपुरताच मर्यादित असलेला हा व्यवसाय आता श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील गुळे, नुवें, वैजावाडा त्याचप्रमाणे पैंगीण पंचायत क्षेत्रातील आमोणे, शिशेव्होळ आणि खोतीगाव पंचायतीपर्यंत पोहोचलेला आहे. आजच्या घडीला एकटय़ा लोलये पोळे पंचायत क्षेत्रातील 40 पेक्षा अधिक व्यावसायिक या व्यवसायात गुंतलेले आहेत. त्याखालोखाल आमोणे, शिशेव्होळ आणि श्रीस्थळ पंचायतीमधील शेतकरी जायांचे पीक मोठय़ा प्रमाणात घ्यायला लागले आहेत. या सर्वांचा हिशेब मांडल्यास 100 पेक्षा अधिक जण जायांचे मळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पिकवत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्याबरोबर कारवारपर्यंत विक्री
सध्या राष्ट्रीय हमरस्त्यावरील गुळे ते पोळेपर्यंतच्या सर्व भागांत तसेच चावडीवरील मुख्य बाजार क्षेत्र, वडामळ, मोखर्ड, पर्तगाळी, माड्डीतळप, शेळी, पोळे येथे जायांचे कळे विकणाऱया महिला दिसत आहेत. त्याशिवाय काही व्यावसायिक शेजारच्या माजाळी, सदाशिवगड, कारवारपर्यंत जाऊन विक्री करत आहेत. तर काही एजंट प्रत्यक्ष या भागात येऊन जायांच्या माळा खरेदी करून जातात. सद्यस्थितीत या तालुक्यात दरदिवशी 5 ते 6 लाख इतके कळे खुटून ते विकले जातात. कधी कधी हा आकडा 8 ते 10 लाख कळय़ांपर्यंत जात असतो.
श्रावणापासून मागणीत वाढ
श्रावण महिन्यात या तालुक्यातील बहुतेक मंदिरांत जायांची पूजा असते. त्यावेळी मंदिर प्रमुखांकडून कळे आगावू नोंदणी करून घेतले जातात. श्रावण हा सणांचा महिना असल्यामुळे बहुतेक व्यक्ती आपल्या घरी देखील जायांचे कळे घेऊन जातात. सुरुवातीला जायांचा दर हजारी 100 रु. इतका होता. मात्र श्रावण महिन्यात हाच दर हजारी 200 रु. इतका झाला. गणेश चतुर्थीच्या सणावेळी तृतीया ते अनंत चतुर्दशीपर्यंतचा कळय़ांचा दर हजारी 500 ते 1000 रु. पर्यंत जात असतो आणि गणेशभक्त कितीही महाग झाले, तरी जायांचे कळे विकत घेत असतात. त्यामुळे केवळ चार महिन्यांपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय काही कोटींच्या घरात पोहोचलेला आहे.
मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे गणेश चतुर्थीवर आणि या तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवर देखील निर्बंध आले होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठय़ा उत्साहाने कामाला लागली आहेत. या तालुक्यात साधारणपणे 11 इतकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून सुरूवातीचे पाच दिवस सोडल्यास बाकीच्या दिवसांत प्रत्येक ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आणि पूजेचे आयोजन केले जाते. त्यावेळी कळय़ांना खूपच मागणी असते, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली.
वातावरणातील बदल, मळय़ांना किडीचा प्रादुर्भाव, अकस्मात येणारा वादळी पाऊस यामुळे देखील या पिकावर परिणाम होत असतो. मात्र अत्यंत किचकट आणि धोक्याचा असा हा व्यवसाय आहे. सकाळी साधारणपणे 8 पासून दुपारपर्यंत रस्त्याच्या बाजूला हातात जायांच्या कळय़ांच्या माळा घेऊन वाट पाहत थांबावे लागते. यात मोठय़ा प्रमाणात महिलांचा सहभाग असतो. काही काही दिवस कळय़ांना मागणीच नसते अशीही परिस्थिती येते, अशी माहिती एका महिलेने दिली. सरकारने या व्यावसायिकांना गरजेप्रसंगी आर्थिक मदत करायला हवी या मागणीला आता जोर चढायला लागला आहे.









