रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे : ग्रामस्थांमधून संताप
वार्ताहर /किणये
बोकनूर गावातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. यामुळे नागरिकांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र रस्ता करून अवघ्या पाच दिवसात रस्ता उखडला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये गावातील व संपर्क रस्त्यांचा समावेश आहे. बोकनूर गावातील आंबेडकर गल्लीतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्ता करून अवघ्या पाचच दिवसांमध्ये रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. यामुळे सोमवारी सकाळी गावातील काही जाणकार नागरिकांनी रस्ता कशा पद्धतीने झाला आहे, याची पाहणी केली. यावेळी सदर काँक्रीटच्या रस्त्यामध्ये सिमेंटचे प्रमाण अगदीच कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे. त्यामुळे सदर रस्ता उखडून जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. काँक्रीटच्या रस्त्याचे सदर कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे कामकाज केले आहे, अशी माहिती गावातील मंगेश पाटील व काही नागरिकांनी दिली आहे. गावात सरकारी योजना राबवून अशा पद्धतीने नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असेल तर या योजना राबविण्याचा उद्देश काय, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. कंत्राटदाराला बोलावून चांगलाच जाब विचारण्यात आला आहे. रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.









