काँगेसचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा
रांची / वृत्तसंस्था
झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे सरकार आता अधिसूचना जारी करण्यासाठी राज्यपालांवर दबाव आणत आहे. राज्यपाल अधिसूचना जारी करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्यामुळे भाजपला घोडेबाजार करण्याची संधी मिळू शकते, असे मत महाआघाडीचे आमदार व्यक्त करत आहेत. महाआघाडीच्या आमदारांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. दुसरीकडे, भाजपच्या सूत्रांनी काँग्रेसचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. मात्र, काँग्रेसचे राज्य प्रभारी अविनाश पांडे हे गेल्या दोन दिवसांपासून झारखंडमध्ये तळ ठोकून आहेत. राज्यात काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी आमदारांशी वन-टू-वन बैठक घेत आहेत.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजप मोठी खेळी खेळू शकेल, अशी भीती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना वाटत आहे. त्यामुळेच सोरेन यांनी आपल्या समर्थक आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याचदरम्यान महाआघाडीच्या आमदारांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. महाआघाडीच्या आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवडणूक आयोगाचा निर्णय जाहीर करण्याची मागणी करणार आहे. मात्र, राज्यपालांनी वेळ दिली की नाही हे स्पष्ट झालेले नाही.









