जत / किरण जाधव :
जत उमराणी रस्त्यावर शहरापासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या फोंड्या माळावर येथील मामा भाचांनी अतिशय कष्टाने भगवा केसर डाळींब शेती फुलवली आहे. तीन एकरावरची ही पहिलीच लागवड निर्यातक्षम दर्जाची आहे. लालभडक आणि चवदार डाळींबाची शेती पहायला परिसरातील शेतकरी येत आहेत.
विशेष म्हणजे त्यांचे हे पहिलेच पीक असून, २० टन माल आणि किमान २५ लाखांचे उत्पन्न अपेक्षीत आहे. कष्ट, सातत्य आणि शेतीशी एकरूप होवून शेतकऱ्यांनी काम केल्यास फोंडामाळ देखील तुम्हाला समृध्दीच्या शिखरावर नेवू शकतो हे एक उत्तम उदाहरण आहे.
जत उमराणी मार्गावर शिवलिंग निलकंठ ढवळेश्वर यांची पन्नास एकर शेती आहे. ढवळेश्वर हे मुळचे कनमडी जि. विजापूर येथील आहेत. चाळीस वर्षापूर्वी त्यांनी येथे दहा एकर शेती घेतली. त्यानंतर येथे द्राक्षबाग आणि विविध फळझाडांची उभारणी केली. त्यानंतर हळूहळू त्यांनी याच शेतीच्या उत्पन्नातून एकाच ठिकाणी पन्नास एकर शेती उभी केली. मुळात शिवलिंग उच्चशिक्षीत आहेत. शिक्षण, अध्यात्म आणि निसर्ग शेती हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या शहरात त्यांनी शैक्षणिक आणि अध्यात्मिक संकुल देखील उभारले आहे.
संत साई इंग्लिश मेडीयम स्कूल आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर गुरुकुल नावाने दोन नामांकीत संस्था चालवत आहेत. श्री. सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या आदर्श विचारांनी वाटचाल करणारे ढवळेश्वर हे शेती, अध्यात्म, मनशक्ती आणि निसर्गशेतीशी ते खूप एकरूप झाले आहेत. पुण्यात राहूनही ते जतमधली शेती गुणवत्तापूर्ण करण्याचे नवनवे प्रयोग आकारास आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
याकामात त्यांना त्यांचे भाचे सुरेश तावशी यांची साथ लाभली आहे. ढवळेश्वर यांचा अधिकचा वेळ शिक्षण, मुल्यशिक्षणाची व्याख्याने, अध्यात्मिक क्षेत्र आणि मनशक्ती या विषयात जात असला तरी शेती क्षेत्रातले नवे तंत्र, बदलती शेती, जागतिक स्तरावर शेती उत्पन्नाचे वाढलेले महत्व, सेंद्रीय शेतीचे फायदे हे विषय त्यांना गप्प बसू देत नव्हते. विविध मासिके, दैनिके, टी.व्ही. चॅनेलवरील देशभरातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहताना आपलीही शेती अशाच पध्दतीने बहरली पाहिजे. येथील प्रयोगांचा उपयोग दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांना झाला पाहीजे, या उदात्त हेतूंनी त्यांनी इथला सारा परिसर विविध शेतपीके, फळझाडे, बागांनी हिरवागार केला.
- पहिलेच डाळींब निर्यातक्षम
शिवलिंग ढवळेश्वर व सुरेश तावशी यांनी तीन एकरात भगवा केसर जातीची डाळींब लागवड केली. सुरूवातीपासून त्यांनी हा प्लॉट ऑरगॅनिक पध्दतीने फुलवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १३४४ झाडांची लागवड केली. संपूर्ण प्लॉटसाठी त्यांनी शेणखत, स्लरी, केएसबी, पीएसबी यासह शेवटच्या टप्यात सरकी व शेंगपेंडीचे डोस दिले. प्रत्येक झाडातील अंतर, पाणी व्यवस्थापन, फळांची वाढ, वजन, स्वच्छता, अच्छादन, कीडनियंत्रण या साऱ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले. प्रत्येक झाडांशी आम्ही रोज बोलतो, एकरूप होतो, त्यामुळे निसर्ग, हवामानातील बदलांवाचे संकेतही आंम्हाला लवकर मिळत गेले. त्यामुळेच आज या बागेतील प्रत्येक झाड लालभडक आणि टपोरी डाळींबांनी लगडलेली दिसतात. जितक्या कष्टांनी व प्रामाणिकपणे प्लॉट उभा केला, तेंव्हा पहिल्याचवर्षी इतके दर्जेदार पीक येईल असे वाटत नव्हते. पण शेतीशी एकरूप होवून काम केल्यास निसर्ग भरभरून देतो, यावर आमचा विश्वास आणखी दृढ झाला, असे शिवलिंग ढवळेश्वर आवर्जुन सांगतात.
- डाळींब प्रक्रिया युनिट उभारणार
आज माझ्याकडे पन्नास एकर शेती आहे. येथे दहा एकर द्राक्ष, दहा एकर डाळींब, उस, आंबा, नारळ अशी विविध फळझाडे तसेच पारंपारीक पीके, पालेभाज्या आणि देशी जनावरे आहेत. पुढच्या टप्यात आणखीन कांही शेतकऱ्यांना एकत्र करून सामुहिक शेतीतून नवे प्रयोग साकारणे. तालुक्यात डाळींबाची लालक्रांती होते आहे. डाळींब हे शंभर टक्के उपयोगात येणारे पीक आहे. त्यामुळे येथे डाळींब प्रक्रिया युनिट उभे करण्याचा मानस असल्याचेही शिवलिंग ढवलेश्वर यांनी तरुण भारत संवादशी बोलताना स्पष्ट केले.








