कराड :
मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारून त्यांच्या गळ्यावर तलवारीने वार केला. हजारमाची (ता. कराड) येथील मळा वॉर्ड येथे शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत जखमी संजय दिनकर शिंदे (वय 56) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुलगा आकाश संजय शिंदे (वय 24) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील मळा वॉर्डमध्ये गावठी ढाब्याच्या पाठीमागे संजय शिंदे हे कुटुंबासह राहण्यास आहेत. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास तुम्हाला बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही, असे म्हणून मुलगा आकाश याने वडील संजय यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच घरातून तलवार घेऊन येऊन त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर वार केला. मात्र, संजय यांनी तो वार चुकवला. तलवारीचा वार कानावर बसल्यामुळे संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.








