शुक्रवारी एकाच दिवसात तीन ठिकाणी घरे फोडल्याच्या घटना
वार्ताहर /नंदगड
हलसाल, कापोली भागात पंधरा दिवसात दुसऱ्यांदा घरच्या दरवाजांचे कडी कोयंड्या तोडून चोरी करण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे या भागातील जनतेत घबराटीचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांपूर्वी याच भागातील शिंपेवाडी व करंजाळ येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला होता. तर शुक्रवारी दुपारी पुन्हा चोरट्यांनी पडलवाडी, हलसाल व कापोली गावातील तीन घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले आहे. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती. पोलिसांनी मात्र आपली हजेरी घटनास्थळी लावली होती. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान हलसाल येथील नामदेव शिंदे यांच्या घरातील सर्व लोक शेताकडे गेले होते. दरम्यान बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोखड व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तर त्याच गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पडलवाडी येथील विलास देसाई यांच्या घरातही चोरी करण्यात आली.
कापोली गावातही चोरी
सुमारे आठ हजार रुपये रोकड घरातून लंपास करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या घरातील एका व्यक्तीने घरात प्रवेश करताच पाठीमागील दरवाजाने चोर पळून गेले. तर हलसालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कापोली गावातील सुभाष निंगनूरकर यांच्या घरातील सोन्याची कुडे व झुबे चोरट्यांनी लंपास केले आहेत. तिन्ही घरांचे बंद दरवाजे व घरात कोणी नसल्याचे पाहून चोरी झाली आहे. चोराने साहित्य जिकडे तिकडे फेकून महत्त्वाच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. गतवर्षी अनेक ठिकाणी चोऱ्या करून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. अनोळखी माणसे दुपारच्या वेळी गावात फिरत आहेत. अशा लोकांना गावात प्रवेश देऊ नये. यासाठी गावोगावी जागृती व्हावी व त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.









