कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. पण आत्तापासूनच दूध संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. संघात नुकत्याच झालेल्या पेट्रोल पंप उद्घाटनाच्या कार्यक्रमात चेअरमन अरुण डोंगळे यांनी सहकारात राजकीय पक्ष नसतात असे सूचक वक्तव्य करत पुढील निवडणूक सध्याचे सत्ताधारी पॅनेल एकत्रच लढेल असे अप्रत्यक्ष संकेतच दिले. मात्र गोकुळच्या गत निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राज्यात झालेल्या राजकीय उलथा पालथीनंतर सध्या गोकुळच्या सत्ताधारी पॅनलमध्ये असणारे बहुतांश नेते आता महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. तरी देखील गोकुळच्या फडात पुन्हा मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या सहकार आघाडीसोबतच महायुतीसोबत असणारे अनेक संचालक दिसण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूध संघात गेली तीस वर्षे सत्तेत असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत गत निवडणुकीत आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली जिह्यातील नेत्यांना एकत्रित आणण्यात आमदार सतेज पाटील यशस्वी झाल्याने गोकुळमधील त्यांचा विजय सुकर झाला. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थितीत बदलून गेली आहे. गोकुळच्या मागील निवडणुकीत महाविकास आघाडीत असणारे आमदार हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश पाटील हे प्रमुख नेते सध्या महायुतीमध्ये आहेत.
महायुतीमधील भाजप व शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी हे लोकसभा, विधानसभा निवडणुकीपुरती पक्षनिष्ठा न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुका ही महायुती म्हणूनच लढवाव्यात यासाठी आग्रही आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर वाच्यताही केली आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका यापुढे महायुती म्हणूनच लढवल्या जातील असे अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या गोकुळसारख्या महत्त्वपूर्ण सहकारी संस्थेची निवडणूकीत पुन्हा सहकार आघाडी होणार की पक्षीय राजकारणाची मोट बांधली जाणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
- चेअरमन डोंगळे, आबाजींची भूमिका महत्त्वाची
गतनिवडणुकीत आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या पॅनेलच्या विजयामध्ये अरुण डोंगळे व विश्वास पाटील हे किंगमेकर ठरले होते. गोकुळमध्ये दूध संस्थांचे सर्वाधिक ठराव या दोन ज्येष्ठ संचालकांकडे आहेत. चेअरमन अरुण डोंगळे यांनी मुश्रीफ–पाटील यांच्या जोडीला राम–हनुमानाची जोडी असे संबोधत गोकुळमध्ये त्यांनी यापुढेही एकत्रित कारभार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र गोकुळची निवडणूक पुढीलकाळात कशा पद्धतीने होईल याचा अंदाज आत्ताच बांधणे शक्य नाही. सध्या चेअरमन अरुण डोंगळे हे महायुती सोबत तर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे महाविकास आघाडी सोबत आहेत. राजकारणात विरोधाभास मात्र सहकारात मित्र असणारे चेअरमन अरुण डोंगळे आणि जे संचालक विश्वास पाटील आबाजी यांची भूमिका ही गोकुळच्या पुढील निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- लोकसभा, विधानसभा निवडणुकीची किनार
गोकुळ संस्था राजकारण विरहित राहावी असे अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीला काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची किनार असणार आहे. दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी व महायुतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याने दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपआपले उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. यामधून सहकारातील राजकारणात एकत्र असणाऱ्या नेत्यांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे गोकुळ राजकारण विरहित राहावे अशी अपेक्षा असली तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा प्रभाव गोकुळच्या निवडणुकीवर नक्कीच दिसून येणार आहे.
- पाटील यांच्यासमोर आव्हान, मुश्रीफ दोन्हीकडे नेतेच
आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून गतनिवडणुकीत जिह्यातील बहुतांश प्रमुख नेत्यांची मोट बांधली. मात्र यानंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आमदार सतेज पाटील यांची काहीअंशी राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. तर गोकुळची निवडणूक राजकारण विरहित होऊ दे अथवा पक्षीय पातळीवर होऊ दे मंत्री हसन मुश्रीफ दोन्ही बाजूला नेतेच म्हणून राहणार आहेत.
- विरोधी आघाडीचे नेतृत्व कोणाकडे ?
गोकुळमध्ये तीस वर्षे सत्तेत असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वर्गीय आमदार पी एन पाटील आणि माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या पॅनलला गत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. या पॅनेलची सद्यस्थिती पाहता माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वय आता जास्त असल्याने त्यांच्यासमोर मर्यादा आहेत. त्यांची पुतणे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील गेल्या चार वर्षात गोकुळमध्ये फारसे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही. तर आमदार पी एन पाटील यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांचे पुत्र राहुल पाटील हे सध्या आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. तर अरुण नरके हे देखील सध्या राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचे पुत्र चेतन नरके हे देखील महाविकास आघाडी सोबत गेले आहेत. त्यामुळे विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार असाही प्रश्न सध्या निर्माण होत आहे.








