समस्या गंभीर बनल्याने ठोस उपायांची गरज
पणजी : कुत्र्यांनी माणसाना चावे घेण्याचे प्रकार मोठ्या संख्येने वाढले असून चालू 2023 वर्षातील जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात ते 11,542 जणांना चावल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. गोव्यात सर्वत्र ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने त्यांचे चावे वाढल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 2022 मध्ये सुमारे 23903 जणांना कुत्रे चावले होते. यंदा 2023 मध्ये पहिल्या 4 महिन्यातच 11,542 जणांना कुत्रे चावल्याने वर्ष संपेपर्यंत चावण्यांची संख्या 2022 पेक्षा जास्त होणार की काय अशी चिन्हे दिसत आहेत. सरकारतर्फे सदर माहिती जारी करण्यात आली असून सरासरीचा विचार केल्यास प्रत्येक दिवशी 96 चावे घेतल्याचे समोर येत आहे. शिवाय 15 मिनिटांनी एक चावा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुत्र्यांची पैदास गोव्यात सर्वत्र मोठ्याप्रमाणात झाली असून गावा-गावातून, शहरातून ते कळपाने मोकाट फिरत असल्याचे पहायला मिळते. त्यांना पुरेसे खाद्य, अन्न मिळत नसल्याने ते पिसाळतात, भुंकतात तसेच पाठीमागे धावून किंवा अचानकपणे चावा घेतात असेही आढळून आले आहे. त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत असे सांगितले जाते परंतु कुत्र्यांची वाढती संख्या पाहिली तर त्याला काही अर्थ नसल्याचे समोर येत आहे. गोव्यासारख्या लहान राज्यात ही एक मोठी समस्या बनली आहे.









