खासदार मानेंच्या बंडाचा परिणाम होणे अशक्य
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील शिवसेनेत उभी फूट पडल्यावर गेली काही दिवस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी अचानक सेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल होत बंड केल्याने पन्हाळा तालुक्यात अस्वस्थता निर्माण झाली. तथापि तालुक्यातील मूळ शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहे त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या बंडाचा पन्हाळा तालुक्यात फारसा फरक पडणार नाही, असे चित्र आहे.
पन्हाळा तालुक्यात शिवसेना तशी जेमतेम 25 टवक्यांपर्यंत आहे. यातील शिवसैनिक सामान्य कुटुंबांतील आहेत. आजवर ते पक्षाशी प्रामाणिक राहिले आहेत. पक्षांमध्ये पक्ष सत्तेत असो अथवा नसो तरीही सामान्य शिवसैनिक निष्ठावंतच राहिला आहे. तालुक्यात गत निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रदीप नरके सत्यजित पाटील सरूडकर हे दोन आमदार व धैर्यशील माने हे खासदार झाले. तथापि माजी खासदार स्व. बाळासाहेब माने, माजी खासदार निवेदिता माने यांचा तालुक्यात स्वतःचा असा गट आहे. त्यामुळे सुमारे 40 वर्षे माने गट म्हणून त्याची स्वतःची अशी ताकद तालुक्यात आहे.
माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचाही स्वतःचा पाटील म्हणून स्वतंत्र गट आहे. तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांचाही नरके-पाटील म्हणून गट आहे. आमदार, खासदार होण्यासाठी स्वतःच्या गटाची ताकद लक्षात घेऊनच त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. शिवसेनेची ताकद पणाला लावून त्यांना खासदार, आमदार केले. त्यांच्या विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे, हे नक्की असले तरी शिवसेनेचे व्यासपीठ यांना मिळाले म्हणूनच हे खासदार, आमदार झाले.
घराणेशाही व परंपरेप्रमाणे माने, नरके, पाटील गट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षातच कार्यरत होते. पुढील पक्षीय स्पर्धांत यांना उमेदवारी मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पक्षाचे व्यासपीठ हवे होते, शिवसेनेला देखील ताकदीचे उमेदवार हवे होते, त्यामुळे शिवसेनेने देखील त्यांना पक्षप्रवेश देऊन पक्षाचे बळ वाढवले. आज शिवसेनेचे खासदार, आमदार झाले तरी तालुक्यातील मूळ शिवसैनिकांशी या खासदार, आमदारांची कधीही मनजुळवणी झाली नाही किंवा शिवसैनिक देखील आपले आमदार, खासदार आहेत म्हणून त्यांच्याकडे फारसे गेलेले नाहीत. शिवसैनिकांना वास्तविक या आमदार, खासदारांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून बळ देणे अपेक्षित होते, पण तसे मात्र घडले नाही. पक्षप्रमुख मुख्यमंत्री असून देखील पक्षाच्या कामापेक्षा किंवा शिवसैनिकांना बळ देण्यापेक्षा स्वतःच्या गटातील कार्यकर्त्यांनाच शासकीय कामे देण्यावर या खासदार, आमदारांचा भर राहिला. त्यामुळे मूळ शिवसैनिक त्यांच्यापासून कायमच दूर राहिले.
तालुक्यातील शिवसेना व तिची ताकद अल्प असली तरी ती निष्ठेने आजवर कायम राहिली आहे. त्यामुळे ही ताकद एखाद्या खासदार, आमदारावर जय, पराजयाचे निश्चित परिणाम करू शकते. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढली, राजू शेट्टींसारखा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेता पंतप्रधान मोदींना स्वतःच्या मतदारसंघात येऊन उभे राहून दाखवा, असे आव्हान देत होता, अशा राजू शेट्टींना कारखानदारांच्या पंगतीला बसले म्हणून जनतेने बाजूला करत धैर्यशील माने यांना खासदार केले. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये खासदार माने यांचे मोठे वलय निर्माण झाले. आज त्यांनी बंड केल्याने कदाचित माने दुसऱया पक्षातून उभे राहिले तरीदेखील त्यांना सहज विजय मिळेल, असे गणित मांडूनच त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील राज्यातील ध्रवीकरण पाहता शिवसेनेची ताकद निश्चितच विचार करायला लावणारी आहे. आज पक्षाशी प्रामाणिक राहिलेला शिवसैनिक उद्याच्या राजकारणात कडवी भूमिका घेऊन बंड करणाऱयांना आस्मान दाखवण्यासाठी लढेल, अशी स्थिती आहे.