चिपळूण :
नगर परिषद आता शहरातील प्रत्येक रस्त्यावर एकाच प्रकारची झाडे लावणार असून त्या झाडाचे नाव त्या रस्त्याला देणार आहे. या अनोख्या उपक्रमाची घोषणा गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आली. यावेळी आमदार शेखर निकम, अभिनेता ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्यावतीने जलतरण तलाव ते व्यू गॅलरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर परिषदेने वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला असून शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर झाडे लावली जाणार आहेत. जलतरण तलाव येथील रस्त्यावर बकुळीची झाडे लावण्यात आली आहेत. अन्य रस्त्यांवर एकाच प्रकारची झाडे लावली जातील व ज्या प्रकारची झाडे लावली जातील त्या झाडांचे नाव त्या रस्त्याला दिले जाईल, असे सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक केले. तसेच वृक्षारोपणासह पर्यावरण रक्षणासाठीच्या उपक्रमांसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. अभिनेता ओंकार भोजने यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. केवळ वृक्ष लागवड करून उपयोग नाही तर त्याचे जतनही केले पाहिजे, असा सल्ला दिला. यावेळी नगर परिषदेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, जलदूत शहानवाज शहा, नाम फाउंडेशनचे समीर जानवरकर, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे राम रेडीज, विश्वास पाटील, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, अविनाश बेंद्रे, शिल्पा शेटे, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलिंद वांगडे, संगणक विभागप्रमुख निवेदिता आंबेकर, विद्युत अभियंता संगीता तांबोळे, वाहन विभागप्रमुख संतोष शिंदे आदी उपस्थित होते.








