जगात अनेक प्रकारच्या प्रथा असतात, परंतु यातील काही प्रथा हादरवून टाकणाऱया असतात. अशीच एक प्रथा चीनमध्ये होती ज्यात छोटय़ा मुलींचे पाय बांधले जात होते. पाय बांधण्याची ही प्रथा कमळासारखे पाय प्राप्त करण्यासाठी पार पाडली जात होती. अनेक शतकांपासून चीनमध्ये ही प्रथा चालत आली आहे.
10 व्या शतकात या प्रथेला सुरुवात झाली होती. मुली 4-6 वर्षांच्या झाल्यावर त्यांचे पाय बँडेजने बांधले जात होते. 3 वर्षांपर्यंतच्या छोटय़ा मुलींपासुन 12 वर्षांपर्यंतच्या मुलींचा अशाप्रकारे छळ केला जात होता.

पायाची 4 बोटे दुमडून तळव्याच्या दिशेने वळविली जात होती, पाय समोरच्या बाजूने टोकदार दिसावा म्हणून हा प्रकार केला जात होता. ही अत्यंत वेदनादायी प्रक्रिया असायची. मध्येमध्ये बँडेज उघडून पायाची स्वच्छता केली जत होती. रक्त, पू, फोड इत्यादी गोष्टी साफ करून पुन्हा बँडेज बांधले जात होते. त्या काळी चिनी पुरुषांना छोटे आणि टोकदार पाय आवडायचे, याचमुळे महिलांसाठी समोरच्या बाजूला टोकदार असणारी पादत्राणे तयार केली जात होती.
1949 मध्ये संपली प्रथा
या प्रथेद्वारे महिलांना आज्ञाधारक करण्याचा प्रयत्न केला जात होता. घरातील अन्य महिलाच या प्रथेचे पालन करवित होत्या. या प्रथेमुळे अपंग होण्याचा धोका वाढत होता. तसेच धनुर्वात, अल्सर किंवा मृत्यू होण्याचाही धोका असायचा. 1662 मध्ये क्विंग साम्राज्याने या प्रथेवर बंदी घातली होती. परंतु लोक तरीही याचे पालन करत राहिल्याने ही बंदी 1668 मध्ये हटविण्यात आली होती. तर 1949 मध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर चीनमधील ही प्रथा पूर्णपणे मोडीत काढण्यात आली होती.









