रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : आपल्याच ट्रक चालकाला तुझे लायसन्स व सामान हवे असेल तर 70 हजार रूपये दे.. नाहीतर तुझ्यावर गाडीची कागदपत्रे चोरल्याचे खोटे गुन्हे दाखल करीन,अशी धमकी देत 70 हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अली फारूख सुर्वे (वय- 26, रा. उद्यमनगर रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तकार दाखल केली.सोहम मधुकर आंब्रे व आकाश मधुकर आंब्रे (दोन्ही रा. चिरणी, ता. चिपळूण) अशी खंडणी मागणाऱ्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली सुर्वे हे आकाश आंब्रे यांच्या ट्रकवर चालक म्हणून कामाला होते. दरम्यान, अली सुर्वे व आकाश तसेच सोहम आंब्रे यांच्या पगाराचे पैसे देण्यावरून वाद झाला होता. यावेळी आकाश व सोहम यांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली, अशी तकार अली सुर्वे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांकडून सोहम व आकाश याच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.
अली सुर्वे यांनी शहर पोलिसांत दाखल केलेल्या तकारीनुसार, 8 ते 14 ऑगस्ट 2023 रोजी या काळात सोहम व आकाश यांनी रत्नागिरी कोर्ट, हातखंबा तिठा व उद्यमनगर येथे 70 हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करू तसेच बदनामी करू, अशी धमकी दिली, असा आरोप दोन्ही संशयितांविरूद्ध ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोहम व आकाश यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. गुह्याचा तपास रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.









