चेन्नई / वृत्तसंस्था
मनमोहनसिंग यांच्या सरकारमधील दूरसंचार मंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमह या पक्षाचे नेते ए. राजा यांनी त्यांच्यावर सुरु असलेल्या बेकायदा मालमत्ता प्रकरणी न्यायालयात उपस्थिती लावली आहे. मंगळवारी येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. राजा मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन मोठय़ा प्रमाणात अवैध संपत्ती कमावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
त्यांची मालमत्ता त्यांच्या ज्ञान उत्पन्न स्रोतांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. मंगळवारच्या सुनावणीत राजा यांना आरोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या. या प्रकरणात राजा यांच्यासमवेत आणखी 15 आरोपी आहेत. सात वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने या सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र सादर केले आहे. राजा यांनी 5.53 कोटी रुपयांची मालमत्ता अवैधरित्या जमा केल्याचा आरोप आरोपपत्रात आहे. सीबीआयने राजा आणि इतर आरोपींना आपल्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासंबंधी कळविले होते. चेन्नईतील विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी पुढची न्यायालयीन हाताळणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. राजा आणि इतर आरोपी यांना या प्रकरणात अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. तथापि, अद्याप सीबीआयने त्यांना अटक पेलेली नाही. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी.शिवकुमार यांनी मंगळवारी सर्व आरोपींना प्रकरणासंबंधीच्या कागदपत्रांच्या प्रती पुरविण्याचा आदेश सरकारी पक्षाला दिला. फेब्रुवारीपासून सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.









