मडगांव : बॉक्सिंगमध्ये काल शेवटच्या दिवशी यजमान गोव्याने तीन सुवर्णपदकांसह प्रत्येकी तीन रौप्य कास्यपदके मिळविली. पेडे क्रीडा संकुल इनडोअरमधील बॉक्सिंग बाऊटमध्ये झालेल्या या स्पर्धेत गोव्यासाठी साक्षी चौधरीने 50 किला वजनीगटात, रजतने 71 किलो वजनीगटात तर गौरव चौहानने 92 किलावरील वजनीगटात गोव्याला सुवर्णपदके मिळवून दिली. याव्यतिरिक्त आकाश गोरखाने 63.5 किलो वजनीगटात, लोकेशने 80 किलो वजनीगटात तर सानामाचा चानू हिने 75 किलो वजनीगटात रौप्यपदके मिळविली. उपान्त्य फेरीत पराभूत झालेल्या रोशन जमीरने 51 किलो वजनीगटात, साई आयुषने 92 किलो वजनीगटात तर निहारिकाने 60 किलो वजनीगटात गोव्याला ब्राँझपदके ािळवून दिली होती.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात बॉक्सिंग खेळप्रकारातील गोव्याची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. काल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाज खेळताना गोव्याच्या रजतने बॉक्सिंगमधील पहिलं सुवर्णपदक मिळवून देताना दोन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन पुरस्कार मिळविलेल्या सेनादलच्या आकाशचा 4-1 असा पराभव केला. साक्षी चौधरीने महिलांच्या लाईट प्लाय वेट प्रकारात मध्यप्रदेशच्या मलिकाचा पराभव केला व गोव्याला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. गौरव चौहानने गोव्याला तिसरे सुवर्ण सुपर हॅवीवेट प्रकारात मिळवून देताना चंदीगढच्या सावन गिल याचा 4-3 असग पराभव केला. महिलांच्या मीडल वेट गटात अंतिम लढतीत गोव्याच्या सानामाच चानू हिला हरियाणाच्या स्विटी बूरा हिच्याकडून 5-0 असे पराभूत व्हावे लागले. पुरूषांच्या लाईट वॅल्टर गटात गोव्याच्या आकाश गुरखाला सेनादलच्या मनीष कौशिक याच्याकडून तर लाईट हॅवी वेट गटात गोव्याच्या लोकेशला सेनादलच्या संजय याच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले.









