वनविभागाला चार महिन्यांपूर्वी कळवूनही वृक्ष हटविण्याकडे दुर्लक्ष : नुकसानभरपाईची मागणी
बेळगाव : भाग्यनगर, सहावा क्रॉस, कृषी कॉलनी येथे बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास एक जुनाट वृक्ष कोसळला. यामध्ये दोन कारचे नुकसान झाले. वनविभागाला कळवूनदेखील त्यांनी वेळेत या धोकादायक वृक्षाला हटविले नसल्याने वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. मंगळवारी दुपारपासून बेळगावसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने बऱ्याच ठिकाणी जुनाट वृक्ष कोसळले. काही ठिकाणी फांद्या कोसळून घरांचेही नुकसान झाले आहे. दुपारी 12 च्या सुमारास भाग्यनगर येथील प्रशांत चोडणकर यांच्या घरासमोर एक जुनाट वृक्ष कोसळला. हा वृक्ष घरासमोर लावण्यात आलेल्या दोन चारचाकी वाहनांवर कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी प्रशांत चोडणकर यांनी वनविभागाला निवेदन देऊन वृक्ष हटविण्याची मागणी केली होती. परंतु, वनविभागाने हा वृक्ष हटविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बुधवारी हा वृक्ष कोसळल्याने दोन्ही वाहनांचे मिळून 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हे नुकसान झाले असून वनविभागाने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.









