वनखात्याकडून पाहणी : परिसरात बसविणार पॅमेरे, नागरिकांत भीती
बेळगाव : मागील चार दिवसांपासून अनगोळ येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम क्रिकेट मैदानावर बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे दिसून आले आहेत. त्यामुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनखात्याने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पुन्हा बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे दिसून आले. त्यामुळे वनखात्याची झोप उडाली आहे. दरम्यान वनखात्याने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. पायांचे ठसे आढळून आलेला प्राणी बिबट्याच आहे की दुसरा कोणता आहे, याची शहानिशा केली जात आहे. रात्रीच्यावेळी परिसरात वावरत असलेल्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी पॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती वनखात्याने दिली आहे. प्राण्याच्या ठशांमुळे अनगोळसह शहर परिसरात खळबळ माजली आहे. भर मानवी वस्तीत हिंस्त्र प्राणी आला कुठून? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील कुत्री गायब होत आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. हा बिबट्यासदृश प्राणी शिकारीसाठी रात्रीच्यावेळी या परिसरात येत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रात्रीच्यावेळी बाहेर पडू नये, असे आवाहनदेखील वनखात्याने केले आहे.
बिबट्यासदृश प्राण्याचा शोध घेण्यासाठी भीमगढ अभयारण्यातील पॅमेरे मागविण्यात आले आहेत. रात्रीच्या शिकारीसाठी बाहेर पडत असलेल्या बिबट्यासदृश प्राण्याचा शोध घेण्यासाठी हे पॅमेरे परिसरात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पॅमेऱ्यात कोणता प्राणी कैद होणार हे स्पष्ट होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. गतवषी रेसकोर्स परिसरात तब्बल महिनाभर बिबट्या दबा धरून बसला होता. बिबट्याच्या शोधासाठी पॅमेरे, हत्ती, श्वान तैनात करण्यात आले होते. अखेर बिबट्या वनखात्याच्या हातातून निसटला होता. शहरात सातत्याने वन्यप्राण्यांचा वावर आढळून येते आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना रोखण्याचे आव्हान वनखात्यासमोर आहे. मागील महिन्यात शास्त्रीनगर आणि शिवाजीनगर परिसरात कोल्हे आढळून आले होते. दरम्यान वनखात्याने शिताफीने या कोल्ह्यांना जेरबंद केले होते. मात्र आता पुन्हा अनगोळ परिसरात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे निदर्शनास आले आहेत. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
परिसरात शोध घेण्यासाठी ट्रॅप पॅमेरे बसविणार
अनगोळ येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम क्रिकेट मैदानात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे निदर्शनास आले आहेत. घटनास्थळी जाऊन ठशांची पाहणी केली आहे. शिवाय परिसरात शोध घेण्यासाठी ट्रॅप पॅमेरे बसविले जाणार आहेत.
-पुऊषोत्तम रावजी (आरएफओ, बेळगाव)
वनखात्याने बिबट्यासुदृश प्राण्याचा लवकर शोध घ्यावा
मागील चार दिवसांपासून या मैदानात बिबट्यासुदृश प्राण्याच्या पायांचे ठसे दिसून येत आहेत. शुक्रवारी सकाळी पुन्हा नवीन ठसे निदर्शनास आले. वनखात्याने जातीने लक्ष घालून या बिबट्यासुदृश प्राण्याचा लवकर शोध घ्यावा. आजूबाजूला मानवी वस्ती आणि शाळा असल्याने भीती निर्माण झाली आहे.
-प्रसाद नाकाडी (स्थानिक नागरिक)
आजूबाजूला शाळा, मानवी वस्ती…
बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आलेल्या परिसराच्या आजूबाजूला शाळा आणि मानवी वस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेषत: या परिसरातील कुत्री गायब होत असल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून वनखात्याने कर्मचाऱ्यांना तैनात करून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.









