प्रतिनिधी/पणजी
रायबंदर येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला 25 वर्षीय युवक जागीच ठार झाला. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला गोमेकॉत पाठविले, तर मृतदेह गोमेकॉच्या शवागरात ठेवण्यात आला. कार चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या कार चालकाचे नाव सतीश हिरणवाला (वय 36, सांगोल्डा) असे आहे. अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव कौशल बांदोडकर (वय 25, चिंबल) व जखमी झालेल्या युवकाचे नाव दिग्वीजय बांदोडकर असे आहे.
हा अपघात रविवारी रात्री उशिरा झाला. कौशल व दिग्वीजय हे दोघे जीए-07-एडी-5171 क्रमांच्या दुचाकीवरून पणजीहून ओल्ड गोव्याच्या दिशेने जात होते, तर जीए-08-एम-3438 क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून सतीश हिरणवाला हाही त्याच दिशेने जात होता. दोन्ही वाहने रायबंदर येथील आयआरबी कँपजवळ पोहचली असता स्विफ्ट कारने दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर कारचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला. वेगात असलेली दुचाकी खाली कोसळल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या कौशल याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला, तर दुचाकीस्वार दिग्वीजय जखमी झाला. ओल्ड गोवा पोलिसांनी स्विफ्ट कार चालकाला अटक करून त्याच्या विरोधात भादंसं 279, 304-ए, मोटर कायदा 134 (ए) (बी) कलमाखाली गुन्हा नोंद केला. पुढील तपास सुरु आहे.









