तबला अन् हार्मोनियन जाळले : संगीतामुळे नैतिक भ्रष्टाचार होत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून अनेक प्रकारचे बदल झाले आहेत. तेथील महिलांना नोकरी करण्यापासून रोखण्यासह शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ब्युटी पार्लर बंद करविण्यात आले आहेत. अफगाणिस्तानात आता संगीताला अनैतिक घोषित करण्याची तयारी केली जात आहे.
अफगाणिस्तानात तालिबानने आता सांगितिक वाद्ये जाळली आहेत. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात तालिबानने तबला, हार्मोनिय आणि गिटार यासारखी वाद्यं जमवून त्यांना पेटवून दिले आहे. संगीताला चालना दिल्याने नैतिक भ्रष्टाचार होतो आणि यामुळे युवांना वाईट वळण मिळू शकते असा दावा हेरात प्रांतात कथित सदाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्रालयाचे प्रमुख अजीज अल-रहमान अल मुहाजिर यांनी केला आहे.
तालिबानने जी सांगितिक वाद्यं जाळली आहेत, त्यात तबला, हार्मोनियम आणि गिटारसोबत ड्रम, एम्प्लीफायर आणि स्पीकर देखील सामील आहे. या वाद्यांची किंमत शेकडो डॉलर्समध्ये होती. तसेच त्यांना हेरात येथील वेडिंग हॉल्समधून जप्त करण्यात आले होते.
ऑगस्ट 2021 मध्ये सत्तेवर आल्यापासून तालिबान सातत्याने नैतिकतेचा दाखला देत महिलांचे अधिकार हिरावून घेत आहे. याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी तालिबानने सर्व ब्युटी पार्लर बंद करविण्याची घोषणा केली होती. अफगाणिस्तानात हजारो ब्युटी पार्लर्स संचालित व्हायचे आणि याची मालकी महिलांकडेच होती. महिलांच्या अधिकारांना संपुष्टात आणूनही तालिबान आता जागतिक स्वीकारार्हतेची अपेक्षा करत आहे.









