परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे लोकसभेत प्रतिपादन : संभल हिंसाचारावर जोरदार शब्दयुद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होत असून संबंध हळूहळू सुधारण्याच्या दिशेने जात आहेत, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत केले आहे. मंगळवारी सदनात या विषयावर त्यांनी वक्तव्य करून भारताची बाजू स्पष्ट केली. 2020 पासून लडाखमधील सीमाक्षेत्रात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष होत होता. तथापि, सातत्यपूर्ण चर्चा आणि सामोपचाराच्या मार्गाचा अवलंब करून भारताच्या नेतृत्वाने आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आता सीमेवरील सैन्यकपातीसाठी प्रयत्न करणे, हे ध्येय आहे. सीमेवर जेव्हा पूर्णत: शांतता प्रस्थापित होईल, तेव्हाच दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये खरी सुधारणा होईल, असेही त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले.
जयशंकर यांनी आपल्या वक्तव्यात लडाख सीमेवर उत्पन्न झालेल्या गेल्या चार वर्षांमधील स्थितीचा आढावा घेतला. गलवान संघर्ष, दोन्ही देशांच्या सैनिक तुकड्यांच्या हालचाली, तणाव कमी करण्यासाठी करण्यात आलेले विविध पातळ्यांवरील प्रयत्न आणि अखेरीस गस्त क्षेत्रातली सैन्यमाघार हे टप्पे त्यांनी स्पष्ट केले. सीमेवर अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तथापि, कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास भारतीय सैन्यदले सज्ज आहेत. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आतापर्यंतच्या करारांवर भाष्य
भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन्ही देशांमधील आतापर्यंत झालेले सीमाशांती करार आणि त्यांची स्थिती यांच्यासंबंधीही भाष्य केले. 1991, 1993, 1996, 2003, 2005 आणि 2012 या वर्षांमध्ये सीमेवर शांतता राखण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये करार झाले होते. शेवटचा करार 2013 मध्ये झाला होता. तथापि, 2020 मध्ये उद्भवलेल्या स्थितीमुळे सीमेवरील शांतता धोक्यात आली होती. मात्र, आता स्थिती पूर्ववत होत आहे. दोन्ही देशांचे सेनाधिकारी आणि राजकीय नेते यांच्यात संवाद वाढला असून त्याचा सुपरिणाम भविष्यात दिसून येईल, अशी शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
संभल हिंसाचारावर खडाजंगी
लोकसभेत मंगळवारी उत्तर प्रदेशातील संभल येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या धार्मिक हिंसाचारांसंबंधी जोरदार चर्चा झाली. या हिंसाचाराला उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे सरकार कारणीभूत आहे, असा आरोप समाजवादी पक्षनेते अखिलेश यादव यांनी केला. राज्य सरकार दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी हे आरोप नाकारले असून दंगलीत झालेल्या प्राणहानीस दंगलखोरच उत्तरदायी आहेत, असा प्रत्यारोप केला. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. त्यामुळे पोलिसांवर गोळीबार करण्याची वेळ आली नाही. दंगलखोरांच्या दोन गटांपैकी एका गटातील लोकांनी गेलेल्या गोळीबारात दुसऱ्या गटातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही बाब व्हिडीओग्राफीतून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बांगलादेशातील स्थिती
लोकसभेत बांगलादेशातील स्थितीवरही सदस्यांनी त्यांची मते व्यक्त केली. भारताने संयुक्त राष्ट्र संघाची शांतीसेना बांगलादेशात नियुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना तृणमूल काँग्रेसने केली. बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तेथे हिंदूंच्या हत्या होत असून त्यांचा छळ केला जात आहे. भारताने परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या पक्षाच्या प्रतिनिधींनी केली. केंद्र सरकार या संबंधी जी पावले उचलेल, त्यांचे आमच्या पक्षाकडून समर्थन केले जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंबंधी भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कामकाज सुरळीत
संसदेच्या शीतकालीन अधिवेशनाचा प्रारंभ 25 नोव्हेंबरपासून झाला. मात्र पहिला संपूर्ण आठवडा आणि दुसऱ्या आठवड्याचा सोमवार विरोधकांच्या गदारोळामुळे वाया गेले. कोणतेही कामकाज झाले नाही. त्यामुळे सोमवारी रात्री झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत समझोता करण्यात आला. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण दिवसभर दोन्ही सदनांचे कामकाज सुरळीत पार पडले. काही महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चाही करण्यात आली. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
ड शीतकालीन अधिवेशनात प्रथमच मंगळवारी संपूर्ण दिवसभर कामकाज
ड चीन, बांगलादेश, संभल आदी मुद्द्यांवर लोकसभेत जोरदार वक्तव्ये
ड सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये कामकाजावर समझोता
ड यापुढचे कामकाज अशाच सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडण्याची शक्यता









