वृत्तसंस्था / श्रीनगर
येत्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास या प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. या भागात गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे सीमावर्ती क्षेत्रांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तथापि, ही स्थिती कायम राहणार नसून लवकरच संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात शांतता निर्माण होईल. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचे अभियान सुरु राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याचे स्वागत मनोज सिन्हा यांनी केले. देशाच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असून जम्मू-काश्मीरलाही त्यातील अनेक योजनांचा लाभ होईल. हा अर्थसंकल्प युवकवर्ग आणि महिला यांच्या प्रगतीला प्राधान्य देणार आहे, अशी भलावण त्यांनी केली. जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद्यांना भीक घालत नाही. प्रदेशात शांतता निर्माण झालेली दहशतवाद्यांना पहावत नाही. त्यामुळे ते जनतेला वेठीस धरुन हिंसाचार करु पहात आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.









