अल कादिर ट्रस्टप्रकरणी दोषी : बुशरा बीबीला 7 वर्षांचा कारावास
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना अल कादिर ट्रस्टप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. हे प्रकरण 190 दशलक्ष पाउंडच्या फसवणुकीशी निगडित आहे. न्यायालयाने इम्रान यांना 14 तर बुशरा बीबी यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात निर्मित तात्पुरत्या न्यायालयात मोठया बंदोबस्तात न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी हा निर्णय दिला आहे.
इम्रान हे मागील 18 महिन्यांपासून अडियाला तुरुंगात कैद आहेत. तर निर्णय देण्यात आल्यावर बुशरा बीबी यांना न्यायालयातूनच अटक करण्यात आली. न्यायालयाने इम्रान यांच्यावर 10 लाख रुपये तर बुशरा यांच्यावर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
हे प्रकरण बहिया टाउनशी निगडित भूखंड आणि पैशांच्या देवाणघेवाणीशी निगडित आहे. यात इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. इम्रान खान आणि बुशरा बीबी यांनी बहिया टाउन लिमिटेडकडुन अब्जावधी रुपये आणि मोठे भूखंड मिळविल्याचा आरोप आहे. न्यायालयाने या आरोपांप्रकरणी दोघांनाही दोषी ठरविले आहे.
इम्रान आणि बुशरा यांच्या विरोधात याप्रकरणी डिसेंबर 2023 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर दुसरीकडे इम्रान यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने पाकिस्तानातील राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. तर एक दिवस अगोदरच इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तान सरकार आणि सैन्यासोबत चर्चा सुरू केली होती.









