वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये स्थापन झालेल्या आणि नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टीट सेंट्रमशी संलग्न असलेल्या ‘पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स’च्या (पीडब्ल्यूए) सदस्यांनी 72 वर्षीय खान यांच्या नामांकनाची घोषणा केली आहे. ‘पीडब्ल्यूए’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंबंधीची माहिती दिली आहे. पाकिस्तानमधील मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) संस्थापक इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी इम्रान खान यांना 2019 मध्येही नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.









