4 पैकी 2 राज्यांमध्ये सैन्य तैनात : अणुकेंद्रांवर कमांडो : हिंसेत 8 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अल कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची 8 दिवसांकरता नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. इम्रान यांना अटक झाल्याच्या विरोधात त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे समर्थक रस्त्यांवर उतरले आहेत. या समर्थकांचा सुरक्षा दलांसोबत संघर्ष होत असून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली आहे.

पाकिस्तानातील हिंसेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असली तरीही बळींचा आकडा प्रत्यक्षात खूपच मोठा असण्याची शक्यता आहे. तर देशातील 4 राज्यांपैकी दोन राज्ये पंजाब अन् खैबर पख्तूनख्वामध्ये सैन्य तैनात करावे लागले आहे. उर्वरित दोन राज्ये सिंध आणि बलुचिस्तानात देखील हिंसा होत आहे. चांग भागातील अणु केंद्रांवर कमांडो तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासह पीटीआयच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
इम्रान यांना बुधवारी एनएबीच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीवेळी तपास यंत्रणेने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. एनएबीने खान यांची पत्नी बुशरा यांच्याकरता अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ही मागणी मंजूर केली नाही.
अटकेशी संबंध नाही : सैन्य
इम्रान यांना झालेल्या अटकेच्या कारवाईशी आमचा कुठलाच संबंध नाही. ही कारवाई कायद्यानुसार झाली आहे. पीटीआयचे काही नेते हिंसा भडकवत असून हा प्रकार सहन केला जाणार नसल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. इम्रान यांना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष देशाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सैन्याने म्हटले आहे.
इंटरनेट सेवा बंद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदेशी दूतावासांच्या कर्मचाऱ्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांच्यावर पंतप्रधानपदी असताना प्राप्त नजराणे विकल्याप्रकरणी आरोप निश्चित झाले आहे. याप्रकरणी दोषी ठरल्यास इम्रान यांना भविष्यात कुठलीच निवडणूक लढविता येणार नाही.
अटक योग्य, पद्धत चुकीची
मंगळवारी रात्री उशिरा इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांच्या अटकेला योग्य परंतु पद्धतीला चुकीचे ठरविले आहे. इम्रान यांना धोका असू शकतो, त्यांना कुठल्याही न्यायालयात हजर राहण्यासाठी आणले जाणार नसल्याचे पाकिस्तान सरकारकडून म्हटले गेले आहे. इम्रान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली होती. इम्रान हे दोन प्रकरणांमध्ये जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात पोहोचले होते. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी इम्रान यांना अटक करण्यात आली आहे.
अल कादिर ट्रस्ट प्रकरण
इम्रान यांनी पंतप्रधान झाल्यावर लँड माफिया मलिक रियाजला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात गोवले. मलिक यांचे लंडनमधील 40 अब्ज रुपये (पाकिस्तानी) जप्त करविले. नंतर ही रक्कम ब्रिटन सरकारने पाकिस्तानला सोपविली. इम्रान यांनी याची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळालाही दिला नव्हती. यानंतर इम्रान यांनी अल कादिर ट्रस्ट स्थापन केला आणि या ट्रस्टने धार्मिक शिक्षण देण्यासाठी अल कादिर विद्यापीठ स्थापन केले. याकरता अब्जावधींची जमीन मलिकने मोफत दिली होती. तसेच त्याने बुशरा बीबी यांना डायमंड रिंग गिफ्ट केली होती. याच्या बदल्यात इम्रान यांनी मलिक याच्यावरील सर्व गुन्हे संपुष्टात आणले होते. तसेच मलिकला कोट्यावधींची शासकीय कंत्राटे मिळवून देण्यात आल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे 60 अब्ज रुपयांचा फटका शासकीय तिजोरीला बसला असल्याचा दावा गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे.









