पाकिस्तानातून बाहेर न पडल्यास खटल्यांना सामोरे जावे लागणार
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान सध्या संकटाला सामोरे जात आहेत. 9 मे रोजी इम्रान खान यांना अटक झाल्यावर पाकिस्तानात घडलेल्या घटनांचे पडसाद अद्याप उमटत आहेत. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामुळे इम्रान खान यांना अभय मिळाले असले तरीही सैन्य आणि सरकार त्यांना दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाही. इम्रान खान यांच्यासमोर सैन्याने दोन पर्याय ठेवल्याचे समजते. पाकिस्तानातील पंजाब सरकारने इम्रान खान यांना बुधवारी 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. इम्रान यांच्या निवासस्थानात 30-40 दहशतवादी लपून असल्याचा आरोप करण्यात आला होता. या दहशतवाद्यांनीच इम्रान यांना अटक झाल्यावर सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले केले होते असाही आरोप आहे. 9 मे रोजी घडलेल्या घटनांमुळे सैन्य अत्यंत नाराज आहे. इम्रान यांच्याकडे आता केवळ दोनच पर्याय असून एक तर त्यांनी दुबई किंवा लंडनमध्ये निघून जावे किंवा सैन्य कायद्याच्या अंतर्गत खटल्यांना सामोरे जावे असे पाकिस्तानच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. सद्यस्थिती पाहता इम्रान हे विदेशात पलायन करण्यास तयार नाहीत. यामुळे त्यांना सैन्य कायद्याच्या अंतर्गत खटल्यांना सामोरे जावे लागू शकते. सैन्य कायद्याच्या अंतर्गत 99 टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे.








