इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन :
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या तोशाखाना (भेटवस्तू) संबंधित खटला रद्द केला आहे. याचबरोबर खान यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमिर फारुक यांनी हा निर्णय दिला आहे.
सुनावणीपूर्वी इम्रान खान यांनी फारुक यांना सुनावणीतून हटविण्याची मागणी केली होती. खान यांच्या वकिलांनी सोमवारी संध्याकाळी उच्च न्यायालयाचे कामकाज संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी एक याचिका दाखल केली होती. न्यायाधीश आमिर फारुक यांच्यासमोर तोशाखाना प्रकरणी निष्पक्ष सुनावणी होऊ शकत नसल्याचा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला होता. इम्रान खान यांच्या विरोधात हा खटला निवडणूक आयोगाकडून दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश फारुख यांनी यापूर्वी दोन प्रकरणांमध्ये इम्रान यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, याचमुळे त्यांना हटविण्याची मागणी करण्यात आल्याचे मानले जात आहे.
याप्रकरणी आता इम्रान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तपास यंत्रणेसमोर हजर व्हावे लागणार आहे. आतापर्यंत बुशरा यांना 13 वेळा नोटीस बजावण्यात आली असली तरीही त्या एकदाही तपास यंत्रणेसमोर हजर राहिल्या नाहीत. यामुळे तपास यंत्रणेने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रकाशित करत बुशरा बीबी चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात येईल असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी लाहोर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. माझी पत्नी गृहिणी असून तिचा राजकारणाशी दुरान्वये देखील संबंध नाही. यामुळे तिला चौकशीपासून सूट दिली जावी असे इम्रान यांनी या याचिकेत नमूद पेले आहे.
तोशाखाना प्रकरण
निवडणूक आयोगासमोर पाकिस्तानी डेमोक्रेटिक मूव्हमेंटने तोशाखाना म्हणजेच नजराण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. इम्रान यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात विविध देशांकडून प्राप्त नजराणे विकल्याचा आरोप करण्यात आला होता. तर इम्रान यांनी हे सर्व नजराणे प्रथम तोशाखान्यामधून 2.15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, तर त्यांची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले होते असा दावा इम्रान यांनी केला होता. प्रत्यक्षात ही रक्कम 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा खुलासा नंतर झाला होता.









