पडताळणीसाठी आधार संबंधित ओटीपी अत्यावश्यक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने त्यांच्या पोर्टल (ईसीआय-नेट) आणि अॅप दोन्हीवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी (ई-साइन) वैशिष्ट्या सुरू केले आहे. याअंतर्गत, मतदार यादीतून नाव जोडू किंवा काढून टाकू इच्छिणाऱ्या किंवा दुरुस्त्या करू इच्छिणाऱ्या कोणालाही आधारशी जोडलेल्या फोन नंबरचा वापर करून त्यांची ओळख पडताळणी करावी लागेल. म्हणजेच मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी अत्यावश्यक ठरणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातील 6,000 हून अधिक मतदारांची नावे सॉफ्टवेअर वापरून चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने (ईसीआय) ऑगस्टमध्येच ई-साइन वैशिष्ट्या लागू करण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत, लोक फॉर्म 6 द्वारे मतदार यादीत त्यांची नावे जोडू शकत होते किंवा फॉर्म 7 द्वारे मृत मतदारासारख्या एखाद्याचे नाव काढून टाकू शकत होते. पूर्वी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर फोन नंबर देऊन नाव नोंदणीकृत केले जाऊ शकत होते, परंतु ते आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक नव्हते.
आधार पडताळणीशिवाय काम होणार नाही
नवीन वैशिष्ट्याअंतर्गत आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराला सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगशी (सीडॅक) जोडलेल्या वेगळ्या ई-साइन पोर्टलवर पुनर्निर्देशित केले जाते. त्यानंतर आधार-लिंक्ड फोन नंबरवर ओटीपी पाठवून त्यांची ओळख पडताळली जाते. वापरकर्त्याची ओळख आधार-सत्यापित झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना निवडणूक आयोगाच्या मूळ साईटवर जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
राहुल गांधींकडून आयोग पुन्हा टार्गेट
या प्रक्रियेत बदल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. ‘ज्ञानेश जी (मुख्य निवडणूक आयुक्त), चोरी पकडल्यानंतरच तुम्हाला या प्रक्रियेत बदल करण्याची आठवण झाली. आता तुम्ही चोरांनाही पकडाल अशी अपेक्षा आहे’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. यावेळी राहुल गांधी यांनी सीआयडीला पुरावे कधी देणार आहात? अशी विचारणाही केली. राहुल गांधी सतत निवडणूक आयोगावर मते वगळल्याचा आरोप करत आहेत. 18 सप्टेंबर रोजी त्यांनी कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघातून 6,000 हून अधिक मते वगळण्यात आल्याचा आरोप केला होता.









