जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मार्कंडेयनगर माध्यमिक कन्नड शाळेत मध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. विषबाधेमुळे 35 हून अधिक विद्यार्थी अत्यवस्थ झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मध्यान्ह आहाराच्या जेवणात पाल आढळून आल्याने काही वेळानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. विद्यार्थी अत्यवस्थ असल्यामुळे पालकांनी आपला रोष व्यक्त केला. ही घटना शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतली आहे. बुधवारी जिल्हाशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी संबंधित शाळेला भेट देऊन पालकांसोबत चर्चा केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मध्यान्ह आहार विभागाचे अधिकारी, तसेच शिक्षणाधिकारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आय. पी. गडाद यांनी दिली.









