पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यास’ परिणामकारक ठरत असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या सर्वेक्षणात दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयांची पूर्व चाचणीच्या तुलनेत उत्तर चाचणीतील कामगिरी 8.15 टक्के, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयांची पूर्व चाचणीच्या तुलनेत उत्तर चाचणीतील कामगिरी 5.47 टक्के, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयांची पूर्व चाचणीच्या तुलनेत उत्तर चाचणीतील कामगिरी 3.15 टक्क्मयांनी वाढल्याचे दिसून आले.
कोरोना काळात निर्माण झालेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा शालेय गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता साध्य करण्यात अडचणी निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढणे, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सेतू अभ्यास हाती घेण्यात आला. यापूर्वी राबवलेल्या या अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील माहितीचे विश्लेषण केल्यावर सेतू अभ्यास परिणामकारक ठरत असल्याचे निदर्शनास आले.
या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने यंदाही राज्यातील मराठी आणि ऊर्दू माध्यमातील 46 लाख 56 हजार 433 विद्यार्थ्यांसाठी छापील स्वरुपात वीस दिवसांचा सेतू अभ्यास उपलब्ध करून देण्यात आला. तसेच राबवण्यात येत आहे. तसेच ऑनलाइनही सेतू अभ्यास उपलब्ध करण्यात आला. या अभ्यासासाठीच्या वेळापत्रकानुसार 30 जून ते 3 जुलै या कालावधीत पूर्वचाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता सेतू अभ्यास पूर्ण करून 27 ते 31 जुलै या कालावधीत उत्तर चाचणी घेतली जाणार आहे.








