वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे मंगळवारी घोषित करण्यात पुरुष आणि महिलांच्या ताज्या मानांकनात भारताची महिला बॅडमिंटनपटू तसेच दुहेरी ऑलिम्पिकपदक विजेती पी. व्ही. सिंधूने 15 वे स्थान मिळवले आहे. पुरुषांच्या विभागात किदाम्बी श्रीकांतचे स्थान घसरले असून तो आता 20 व्या स्थानावर आहे.
महिला एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत पी. व्ही. सिंधूचे स्थान दोन अंकांनी वधारले. यापूर्वी ती या मानांकन यादीत 17 व्या स्थानावर होती. पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा किदाम्बी श्रीकांत 20 व्या स्थानावर आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा संपली असून या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्याला या स्पर्धेत भारताच्या प्रियांशू राजावतकडून पराभव पत्करावा लागला होता. पुरुष एकेरीच्या मानांकन यादीत एच एस प्रणॉय नवव्या तर लक्ष्य सेन दहाव्या स्थानावर आहे.









