मंत्री गोविंद गावडे यांची माहिती, भोम येथील सरकारी विद्यालयाच्या नुतन इमारतीची पायाभरणी
वार्ताहर / माशेल
प्रियोळ मतदारसंघातील सरकारी प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिलासादायक आहे. भोम येथील सरकारी प्राथमिक शाळेत पटसंख्या जास्त असल्याने वर्ग कमी पडू लागले होते. त्यावर उपाय म्हणून सुसज्ज अशी विद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
भोम अडकोण येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत साळगावचे आमदार तथा गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, बेतकी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भेसले, भोम अडकोणचे सरपंच दामोदर नाईक, प्रियोळ मतदारसंघातील विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शिक्षण संचलनालयाचे संचालक शैलेश झिंगडे, नमिता नाईक, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, साधन सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रियोळ मतदारसंघातील कित्येक शाळेचे नुतनीकरण तर काही नवीन शाळा बांधल्या आहेत. त्यामुळे बंद पडणाऱ्या शाळेत आज चांगली पटसंख्या असून वर्षानुवर्षे पटसंख्या वाढत आहे. थोडयाच दिवसात दोन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार असल्याची त्यानी घोषणा केली. भोम येथील शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. त्यामुळेचे येथे दोन मजली इमारत बांधण्यात येत आहे. शिवाय शाळेच्या समोरील जागा अपुरी असल्याने त्यांना शेवटच्या मजल्यावर छोटे मोठे खेळ व इतर कार्यक्रम करता येईल. याशिवाय स्थानिकांना शिबिरे व कार्यशाळा घेण्याची मुभा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रियोळ मतदारसंघात शाळाचे नूतनीकरण जोमात
प्रियोळ मतदारसंघात आज नुतन शाळा इमारती, शाळेचे नुतनीकरण होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्याचे सातत्dयाने मिळणारे सहकार्य त्याचप्रमाणे साधन सुविधा महामंमडळाचे महत्वाचे सहकार्य मिळत आहे. शाळेसाठी साधनसुविधा शिवाय प्रियोळ मतदारसंघाचा सर्वतोपरी विकास होत आहे. सर्व एकजुटपणे कार्य केल्यास विकासाला कुठल्याही प्रकारे खिळ बसणार नाही असे त्यानी शेवटी सांगितले.
मंत्री गावडे यांच्याहस्ते इमारतीच्या शिलान्यास करून, फलकाचे अनावरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा भगत यांनी स्वागत केले. यावेळी माजी शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी सरपंच दामोदर नाईक यानी आभार मानले. यावेळी ते म्हणाले की भोम अडकोण पंचायत क्षेत्रात आज कित्येक विकासकामे झपाट्यात होत आहे. त्यासाठी त्यानी मंत्री गोविंद गावडे याचे विशेष आभार मानले.









