9 महिन्यांच्या काळानंतर नवे उच्चायुक्त नियुक्त करण्यावर सहमती : पंतप्रधान मोदी- मार्क कार्नी यांच्यात चर्चा
वृत्तसंस्था/ कनानास्किस
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात जी-7 शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी नवे उच्चायुक्त करण्यावर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देश पुन्हा सामान्य राजनयिक सेवा सुरू करण्यासाठी नवे उच्चायुक्त नियुक्त करतील. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना लाभ होणार आहे. कार्नी आणि मोदींनी परस्पर सन्मान, कायद्याचे राज्य आणि सार्वभौमत्वाच्या मूल्याबद्दल प्रतिबद्धतेच्या आधारावर कॅनडा-भारत संबंधांच्या महत्त्वाची पुष्टी केल्याचे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे.
विदेश सचिव विक्रम मिसरी यांनीही पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांच्यातील चर्चेची माहिती दिली. दोन्ही देशांचे प्रमुख या महत्त्वपूर्ण संबंधात स्थिरता आणण्यासाठी संतुलित पाऊल उचलण्यावर सहमत झाले. यातील पहिले पाऊल हे परस्परांच्या राजधानींमध्ये लवकरात लवकर उच्चायुक्त नियुक्त करणे असेल. अन्य कूटनीतिक पावलेही काळासोबत उचलली जातील, असे मिसरी यांनी सांगितले.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी व्यापार, लोकांमधील संपर्क आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये वरिष्ठ आणि कार्यकारी स्तरावरील व्यवस्था आणि चर्चा पुन्हा सुरू करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. तसेच स्वच्छ ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, एआय, अन्नसुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजं अणि पुरवठा साखळीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर संभाव्य सहकार्यावरही दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.
कार्नी यांचे अभिनंदन
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडाच्या निवडणुकीतील मोठ्या विजयाबद्दल कार्नी यांचे अभिनंदन केले. भारत आणि कॅनडाचे संबंध अनेकार्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कॅनडाच्या अनेक कंपन्यांची भारतात गुंतवणूक आहे. भारताच्या लोकांचीही कॅनडात अत्यंत मोठी गुंतवणूक आहे. लोकशाहीवादी मूल्यांना समर्पित कॅनडा आणि भारताला एकत्र येत लोकशाहीला मजबूत करावे लागेल, मानवतेला मजबुत करावे लागेल, असे कार्नी यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांना लाभ होण्याकरता अनेक क्षेत्रांमध्ये मिळून पावले उचलावी लागतील, असे उद्गार मोदींनी यावेळी काढले आहेत. मे 2025 मध्ये कार्नी यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर दोन्ही नेत्यांदरम्यान ही पहिलीच भेट होती.
निज्जरच्या हत्येनंतर बिघडले होते संबंध
मागील वर्षी कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली होती. तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केले होते. कॅनडात भारतीय उच्चायुक्त आणि अन्य राजनयिकांना दहशतवाद्याच्या हत्येच्या चौकशीशी जोडल्यावर स्थिती आणखी बिघडली होती. त्यानंतर कॅनडाने उच्चायुक्त संजय वर्मा यांनी ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ घोषित केले हेते. यानंतर भारतानेही प्रतिक्रिया देत कॅनडाच्या 6 मुत्सद्यांची हकालपट्टी केली होती.
पंतप्रधान मोदींचे स्वागत करणे सन्मानाची बाब
जी-7 परिषदेत पंतप्रधान मोदींचे स्वागत करणे सन्मानाची बाब आहे. भारत 2018 पासून जी-7 परिषदांमध्ये भाग घेत राहिला आहे, यातून भारताची भूमिका आणि नेतृत्व दिसून येते. ऊर्जासुरक्षा, बदल, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, दहशतवाद आणि इतर मुद्द्यांवर भारतासोबत मिळून काम करण्यास तयार असल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे.









