स्वतःच्या सरकारचे केले कौतुक ः बँकांचा एनपीए कमी असल्याचा उल्लेख
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सरकारी बँकांची स्थिती चांगली असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. स्वतःच्या सरकारच्या कौतुकार्थ ट्विट करत सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे सरकारी बँकांची चांगली कामगिरी समोर येत असल्याचे म्हटले आहे. स्टेट बँक इंडिया, बँक ऑफ बडोदा, युको बँक आणि कॅनरा बँकेच्या नफ्याची आकडेवारी त्यांनी मांडली आहे. तसेच बँकांचा एनपीए कमी असल्याचा उल्लेख त्यांनी स्वतःच्या पोस्टमध्ये केला आहे.
सरकारी बँकांचा एनपीए कमी करणे आणि सरकारी बँकांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आमच्या सरकारच्या निरंतर प्रयत्नांचे ठोस परिणाम आता दिसू लागले आहेत. सर्व 12 सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱया तिमाहीत 25,625 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वार्षिक आधारावर तिमाही नफ्यात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सहामाही आधारावर 31.6 टक्क्यांची वृद्धी झाल्याचे सीतारामन यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
2023 आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत वार्षिक आधारावर एसबीआयचा नफा 74 टक्क्यांनी वाढून 13,265 कोटी रुपये झाला आहे. कॅनरा बँकेने नफ्यात 89 टक्क्यांची वाढ प्राप्त करत 2,525 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. यूको बँकेच्या नफ्यातही 145 टक्क्यांची भर पडली असून हा आकडा 504 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर बँक ऑफ बडोदाच्या नफ्यात 58.70 टक्क्यांची वाढ होत आकडा 3,312 कोटी रुपयांवर गेला आहे.
राज्यांची भूमिका महत्त्वाची
राजकोषीय मजबूती ही ‘आत्मनिर्भर भारत’साठी एक महत्त्वाचा घटक आहे. काही राज्यांनी अनावश्यक गोष्टींसाठी अंदाधुंदपणे कर्जाची उचल करणे आणि खर्च करणे आमच्या चिंतेचा विषय आहे. केंद्र अशाप्रकारचे कर्ज घेण्याबद्दल राज्यांशी चर्चा करू शकतो आणि त्यांना विचारणा करू शकतो. परंतु अनेक राज्यांना हा प्रकार स्वतःच्या अधिकारक्षेत्रातील हस्तक्षेप वाटू लागतो. संघीय संबंध सहकार्य, सामूहिकपणा आणि समन्वयाने प्रस्थापित होत असतात असे म्हणत सीतारामन यांनी केंद्र आणि राज्यातील संबंधांना बिघडविण्यासाठी चुकीची राजकीय चर्चा काही जणांकडून केली जात असल्याचे शनिवारी म्हटले होते.
रुपया-डॉलरसंबंधी वक्तव्य
अर्थमंत्री सीतारामन यांनी अलिकडेच अमेरिकेच्या दौऱयादरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरणीवरून एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भारतीय चलन कमकुवत झालेले नाही, तर डॉलर मजबूत झाला असल्याचे त्यांनी म्हटले होते. अर्थमंत्री या वक्तव्यावरून विरोधकांच्या टीकेला सामोऱया गेल्या होत्या. तसेच सोशल मीडियावर या वक्तव्यावरून मीम्स व्हायरल झाले होते.









