अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा : शिवतेज संघटनेतर्फे ग्रामपंचायतीला निवेदन
वार्ताहर/सांबरा
मुचंडी येथील पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने श्री सिद्धेश्वर यात्रेपूर्वी सुरळीत करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवतेज संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच शिवतेज संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे. गावाला सध्या पाणी समस्येने ग्रासले आहे. चार ते पाच दिवसाआड गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. वास्तविक दररोज पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. योग्य नियोजनाअभावी गावामध्ये पाणी समस्या निर्माण झाली आहे. गावात चार पाण्याच्या टाक्या असून यातील एकाच टाकीचा वापर होत आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळजोडणी करण्यात आली आहे. मात्र नळांना अद्याप पाणीच सोडण्यात आलेले नाही. तसेच जलशुद्धीकरणासाठी बारा हजार लिटर क्षमतेची टाकीही वापराविना पडून आहे. त्यामुळे गावामध्ये गंभीर पाणी समस्या निर्माण झाली आहे. तसेच 9 एप्रिलपासून श्री सिद्धेश्वर यात्रा होणार आहे. यात्रेपूर्वी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवतेज संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. पीडिओ अभिनंदन यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सिद्धार्थ भातकांडे, धनंजय मोदगेकर, बसवंत आंबोजी, श्रीधर यल्लारी, योगेश चौगुले उमेश आव्वाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









