युयुसीएमएस सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना फटका : अभाविपचे आंदोलन
बेळगाव : बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांमधील युयुसीएमएस सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. वरचेवर सर्व्हरडाऊनमुळे शुल्क भरणेही अशक्य झाले आहे. काहीवेळा शुल्क भरूनदेखील अर्ज जमा होत नसल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून या त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी राणी चन्नम्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले.
परीक्षांसाठी अर्ज करताना युयुसीएमएस सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाईन शुल्क भरावे लागते. शुल्काची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून वजा होऊनही अर्ज स्वीकारला जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज भरले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्जासाठी भरलेली रक्कम पुन्हा मिळावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली.
बेळगावसह बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या समस्या आल्या आहेत. विद्यापीठाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसले तरी भविष्यात विद्यार्थ्यांना परीक्षांपासून वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने हा गोंधळ दूर करून विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









