जिल्हा सचिव विपूल बन्सल यांचा आदेश : विविध विभागांचा घेतला आढावा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात यावर्षीचा दहावीचा निकाल सरासरी लागला. शिक्षणाचा दर्जा खालावल्याने तो सुधारण्यासाठी योजना आखणे गरजेचे आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जीर्ण वर्गखोल्याऐवजी पर्यायी इमारतींची व्यवस्था करावी आणि मुलांच्या उपस्थितीकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना वाणिज्य कर आयुक्त व जिल्हा प्रभारी सचिव विपूल बन्सल यांनी केली. शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांसह इतर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, अनुदानित शाळांमधील निकाल घसरला आहे. तो वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलावीत. यावर्षीच जिल्ह्यात चांगला पाऊस आहे. बियाणे तसेच खतांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घ्यावी. निकृष्ट दर्जाची बियाणे पुरविण्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
अनुसूचित जातींची जणगणना वेळेत पूर्ण करा
जिल्ह्यात अनुसूचित जातींची सुरू असलेली जणगणना वेळेत पूर्ण करावी. समाज कल्याण आणि निवासी शाळांसाठी निधी उपलब्ध केला जात आहे त्याचा योग्य वापर करावा असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, शहरात उड्डाण पूल बांधण्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. बियाणे व खतांचा तुटवडा नाही. पावसामुळे घरांचे नुकसान झाल्यास लाभार्थ्यांना तात्काळ मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
निकाल वाढीसाठी प्रयत्न
निकाल वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी सांगितले. यावेळी फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोंडा, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी अभिनव जैन, महानगरपालिका आयुक्त शुभा बी., श्रावण नाईक यांच्यासह इतर उपस्थित होते.









