वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बनविण्यात आला आहे. याचा मोठा त्रास छोट्या मालवाहू रिक्षा, दुचाकीस्वारांना होत आहे. त्यामुळे वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव कृषी उत्पन्न बाजारासमोरील रस्त्यावरून वेअर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंधरवड्यापूर्वी भरधाव कारचालकाने दुचाकीस्वाराला ठोकरले होते. याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने घाईगडबडीने रस्त्यावर या ठिकाणी गतिरोधक घालण्यात आले. मात्र गतिरोधक घालताना त्याची उंची जादा तर रुंदी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील गतीरोधकावर मालवाहू रिक्षा गेल्यास खालच्या बाजूला गतिरोधकावरून घासून गाडी पुढे जात आहे. त्यामुळे वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच हा गतिरोधक चुकविण्यासाठी दुसऱ्या रस्त्याने जावे लागत आहे. त्यामुळे डिझेलसाठी जादा पैसे खर्च करावे लागत आहेत. शिवाय वेळसुद्धा वाया जात आहे.
दुचाकी आणि कारगाडीला फटका
ज्याठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत. याठिकाणी मुख्य कांदा-बटाट्याची बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. या गतिरोधकाचा फटका कारचालकांना आणि दुचाकीस्वारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात बसत आहे.









