बेळगाव जिल्हय़ातील 1 हजार 416 वर्गखोल्या मोडकळीला : सरकारचे दुरुस्तीकडे दुर्लक्षच : शाळा सुधारणेसाठीचा निधी नेमका कोणाच्या घशात?

प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकातील सरकारी शाळांच्या 2022-23 च्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ झाला. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह आहे. परंतु मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या व इमारतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्हय़ातील 1 हजार 416 वर्गखोल्या मोडकळीस आल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही वर्गखोल्या केव्हा कोसळतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी राज्य सरकार खेळ करीत आहे का? असा संतप्त सवाल पालकांमधून विचारण्यात येत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 457 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 959 वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा पंचायतीच्या राखीव फंडातून दरवषी लाखो रुपयांचा निधी शाळांच्या सुधारणेसाठी खर्च करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी शाळांची अवस्था बिकट झाली असून, शाळा सुधारणेसाठी वापरलेला निधी नेमका कोणाच्या घशात गेला? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
सरकारी शाळा टिकाव्यात यासाठी नवनवे उपक्रम राबविले जात आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सरकारी शाळांमधील पटसंख्येत वाढ झाली. परंतु पटसंख्येत वाढ झाली असली तरी शाळांच्या इमारतींचा दर्जा मात्र दिवसेंदिवस खालावत आहे. बऱयाच शाळांचे छत गळत असल्यामुळे छत्र्या घेऊन सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची विदारक स्थिती आहे. शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत. बऱयाच शाळांमध्ये पावसात जमिनीतून पाणी येते. छताचे प्लास्टर सुटत असून छत केव्हा कोसळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे जीव धोक्मयात घालून विद्यार्थी शाळांमध्ये शिकत
आहेत.
महापुरात शाळांची झाली पडझड
2019 मध्ये बेळगाव जिल्हय़ात महापूर आला होता. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा या नद्यांचे पाणी दुथडी भरून वाहत होते. या महापुरामध्ये बऱयाच शाळांची पडझड झाली होती. पाणी शिरून इमारतींचे व फर्निचरचेही नुकसान झाले होते. परंतु त्यातील बऱयाचशा शाळांची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. 2021-22 या शैक्षणिक वर्षातही धुवांधार पावसामुळे वर्गखोल्यांचे नुकसान झाले होते.
अनगोळ येथील शाळा मोडकळीस
केवळ ग्रामीण भागातीलच नाही तर बेळगाव शहरातीलही शाळा मोडकळीस आल्या आहेत. अनगोळ येथील मराठी मुलांची शाळा क्र. 6 मधील 9 पैकी 8 वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. 1987-88 साली जिल्हा पंचायतीच्या अनुदानातून वर्गखोल्या बांधण्यात आल्या होत्या. तेव्हापासून आजतागायत याची दुरुस्ती किवा डागडुजी करण्यात आलेली नाही.
पावसाळय़ाच्या दिवसात छताला गळती लागते. तर बाजूच्या तळय़ातील पाणी झिरपून जमिनीतूनही पाणी येते. वर्गखोल्यांना भल्या मोठय़ा भेगा पडल्या असून, त्यामधून सरपटणारे प्राणी वर्गात येत आहेत. सरकारी शाळेच्या झालेल्या या अवस्थेबद्दल पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शाळा दुरुस्तीकडे सरकारकडे प्रस्ताव
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील बऱयाच शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती व्हावी, तसेच नव्या वर्गखोल्या बांधाव्यात याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. ज्या वर्गखोल्या अत्यंत धोकादायक आहेत अशा वर्गांव्यतिरिक्त इतर वर्गांमध्ये विद्यार्थी बसविले जात आहेत.
– बसवराज नलतवाड (जिल्हा शिक्षणाधिकारी)
सुरक्षित शिक्षण द्या! – श्रावणी बडिगेर

अनगोळ येथील सरकारी मराठी शाळा क्र. 6 मध्ये मी शिकत आहे. पावसाळय़ाच्या दिवसात वर्गामध्ये पाणी येत असल्याने आम्हाला पाठावर बसून शिक्षण घ्यावे लागते. त्यातच छतालाही गळती लागली असल्याने छत्री घेऊन बसावे लागते. गिलावा कोसळत असून सरपटणारे प्राणी भिंतींच्या भेगांमध्ये बसत आहेत. यामुळे शाळेची दुरुस्ती करून आम्हाला सुरक्षित शिक्षण द्या, अशी मागणी विद्यार्थिर्नी श्रावणी विजय बडिगेर हिने केली.
जिल्हय़ातील मोडकळीस आलेल्या वर्गाखोल्या
| तालुका | वर्ग खोल्यांची संख्या |
| बेळगाव शहर | 51 |
| बेळगाव ग्रामीण | 18 |
| खानापूर | 65 |
| चिकोडी | 161 |
| निपाणी | 116 |









