पहिले अतिरिक्त मुख्य कौटुंबिक न्यायालयाचा दणका
बेळगाव : महिलेला पतीने व मुलाने झिडकारले. त्यामुळे त्या महिलेला आपल्या मुलीचा आधार घ्यावा लागला. सदर महिलेने पोटगीसाठी दावा दाखल केला. न्यायालयाने महिना 5 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. मात्र एक पैसाही देणार नाही, असे म्हणत पोटगी देण्यास नकार दिला. त्यामुळे पहिले अतिरिक्त मुख्य कौटुंबिक न्यायालयाने बाप-लेकाला न्यायालयीन कोठडीत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. शांता कृष्णा निलजकर (वय 64, रा. मूळगाव सुळगा-हिं., सध्या रा. हलगा) हिला पती कृष्णा चन्नाप्पा निलजकर (वय 69) आणि मुलगा सिद्राय कृष्णा निलजकर (वय 44) यांनी घरातून बाहेर काढले. त्यानंतर ती हलगा येथील आपल्या मुलीकडे राहत आहे. तिने पती कृष्णा आणि मुलगा सिद्राय यांच्याकडून पोटगी मिळावी, असा दावा न्यायालयात दाखल केला.
न्यायालयात यावर सुनावणी झाली. 17 जानेवारी 2022 रोजी न्यायालयाने सदर महिलेला महिना पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. मात्र आजतागायत त्यांनी एक पैसाही दिला नाही. एकूण 2 लाख 50 हजार रुपये रक्कम झाली होती. किमान थोडी तरी रक्कम त्या महिलेला द्यावी, अशी मागणी तिचे वकील जोतिबा पाटील यांनी न्यायालयासमोर केली. तरीदेखील त्यांनी नकार दिला. त्यामुळे वकिलांनी दोघांनाही कारागृहात डांबावे, अशी मागणी केली. त्यावेळी संबंधित दोघांनाही न्यायालयाने कारावासास पाठविले आहे. शांता तसेच कृष्णा हे दोघेही वृद्ध झाले आहेत. मात्र मुलांनी शांताचा सांभाळ करण्याकडे दुर्लक्ष केले. पतीनेही झिडकारले. त्यामुळे शांता आपल्या मुलीकडे राहत आहेत. त्यामुळे न्यायालयाने हा दणका दिला आहे. अॅड. जोतिबा पाटील, अॅड. सपना दादू महातुकडे यांनी या महिलेच्यावतीने काम पाहिले.









