वृत्तसंस्था/अनंतपूर
2024 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारी येथे सुरू झालेल्या सामन्यात इशान किशनच्या दमदार शतकाच्या जोरावर इंडिया क संघाने पहिल्या डावात 5 बाद 357 धावा जमविल्या. या शतकामुळे इशान किशनचे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन झाले आहे. इंडिया ब आणि इंडिया क यांच्यातील सुरू झालेल्या या सामन्यात 79 षटकांत इंडिया क ने 5 बाद 357 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशनचे शानदार शतक (111), बाबा इंद्रजितचे अर्धशतक (78) आणि ऋतुराज गायकवाड नाबाद (46) ही इंडिया क डावातील वैशिष्ट्यो आहेत. इंडिया ब तर्फे मुकेशकुमारने 76 धावांत 3 गडी बाद केले.
इंडिया क च्या डावाला सुरुवात झाल्यानंतर त्यांचे दोन फलंदाज रजत पाटीदार आणि साई सुदर्शन हे लवकर बाद झाले. पाटीदारने 40 तर साई सुदर्शनने 43 धावा जमविल्या. इंडिया कची स्थिती 2 बाद 97 अशी होती. इंडिया कचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 46 धावा झोडपल्या. इशान किशनने 126 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 111 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक इंडिया क प. डाव 79 षटकात 5 बाद 357 (इशान किशन 111, बाब इंद्रजित 78, ऋतुराज गायकवाड खेळत आहे 46, मुकेशकुमार 3-76).









