► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती करता येणे शक्य नाही, असा पुनरुच्चार आम आदमी पक्षाने केला आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष सध्या दिल्ली राज्यात सत्तेवर असून भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील गेल्या सलग दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. आम आदमी पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीचा एक सदस्य पक्ष असल्याने यंदा विधानसभा निवडणुकीत तो काँग्रेसशी युती करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, ती फोल ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. अद्याप दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नाही. तथापि, हा पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे. ही निवडणूक स्वबळावर लढविली जाईल, अशी घोषणा या पक्षाने काही आठवड्यांपूर्वीच केली होती. लोकसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाने काँग्रेसशी दिल्ली आणि पंजाबमध्ये युती केली नव्हती. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीच्या स्थैर्याविषयी संशय बळावत आहे.
काँग्रेस एकाकी?
विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसला एकाकी पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पक्ष या चार प्रमुख पक्षांनी आघाडीचे नेतृत्वही काँग्रेसकडून काढून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आतापर्यंत काँग्रेसने या प्रयत्नाला विरोध केला आहे. पण दबाव वाढल्यास त्या पक्षाला झुकावे लागेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, विरोधी पक्षांच्या आघाडीच्या भवितव्याविषयीही आता चर्चा केली जात आहे









