केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चीनला प्रत्युत्तर
किथिबू / वृत्तसंस्था
भारताला घाबरविण्याचा काळ आता संपला आहे. भारताच्या भूमीत आता सुईच्या अग्राइतके अतिक्रमण करणे कोणाला शक्य होणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. ते अरुणाचल प्रदेशातली किथिबू या खेडय़ात विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर भाषण करत होते.
भारताच्या उत्तरसीमेवरील अनेक खेडय़ांसाठी केंद्रसरकारने ‘प्रगत ग्राम योजना’ (व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम) बनविली आहे. या योजनेअंतर्गत या ग्रामांमध्ये मार्ग, दूरसंचार व इतर सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या मार्गांचा उपयोग स्थानिकांसमवेत सैन्याच्या गतीमान हालचालींसाठीही होणार आहे.
अरुणाचल प्रदेश ही उगवत्या सूर्याची भूमी आहे. हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. येथे येताक्षणीच शेकडो निर्झरांचे दर्शन होते, जे अन्यत्र कोठे होत नाही. अशी ही भूमी पूर्णतः सुरक्षित असावी, अशी देशाच्या सरकारची इच्छा आहे. त्यामुळे या राज्यातील अनेक सीमावर्ती ग्रामांची निवड प्रगत ग्राम योजनेसाठी करण्यात आलेली आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
इंडो तिबेटियन पोलिसांची प्रशंसा
इंडो तिबेटियन सीमा पोलिसांच्या कार्याचे आणि धैर्याचे अमित शहा यांनी कौतुक केले. हे पोलिसदल सीमेचे संरक्षण रात्रंदिवस डोळय़ात तेल घालून करीत आहे. त्यामुळे आज भारताच्या आतल्या भागातील सर्वसामान्य नागरीक सुखाची झोप घेऊ शकतात. आमच्या संरक्षण दलांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित असून कोणीही आमच्या भूमीत घुसखोरी करण्याचे धाडस करु शकणार नाही. सध्याच्या केंद्र सरकारने ही शाश्वती देशाला दिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
काँगेसवर जोरदार हल्लाबोल
काँगेस या देशात साठ वर्षे सत्तेवर राहिली. तथापि, सामरिकदृष्टय़ा अतिसंवेदनशील असणाऱया ईशान्य भारताकडे या पक्षाने आपल्या सत्ताकाळात अक्षम्य दुर्लक्ष केले. साधे मार्गही येथे बांधण्यात आलेले नव्हते. काँगेस 12 वेळा सत्तेवर आली. पण या काळात या पक्षाने जितके काम केले नाही, त्यापेक्षा जास्त काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अवघ्या दोन कालखंडांमध्ये केले आहे. सरकारच्या कामाचा झपाटा पाहून विरोधक अस्वस्थ झाल्याची टीका त्यांनी केली.
शहांच्या दौऱयावर चीनची नाराजी
अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱयावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असून त्यामुळे तो चीनच्या मालकीचा आहे, असा चीनचा दावा आहे. तथापि, भारताने चीनच्या दाव्याला विरोध केला असून अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, हे सत्य स्पष्ट केलेले आहे. भारताचा कोणताही नेता अरुणाचल प्रदेशला भेट देण्यासाठी आला की. चीन नेहमीच नाराजी व्यक्त करत असतो. तशी त्याने यावेळीही व्यक्त केली आहे.









