अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा युरोपीय देशांना आग्रह
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
रशियाने युक्रेनशी युद्ध थांबविले नाही, तर युरोपियन देशांनी चीन आणि भारतावर 100 टक्के व्यापार शुल्क लावावे, असा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धरला आहे. मंगळवारी युरोपियन महासंघाच्या नेत्यांशी चर्चा करताना त्यांनी ही मागणी केली आहे. रशियाने युक्रेनप्रमाणेच आता पोलंड या देशावरही ड्रोन्स पाठविल्याने ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
चीन आणि भारतावर मोठा कर युरोपियन देशांनी लावल्याशिवाय ते देश रशियाच्या तेलाची खरेदी बंद करणार नाहीत. त्यांनी ही खरेदी बंद केली नाही, तर रशियाला पैसा मिळत राहील आणि रशिया युक्रेनशी युद्ध करीत राहील, असेही ट्रम्प यांनी युरोपियन नेत्यांसमोर स्पष्ट केल्याचे वृत्त समोर आले आहे.
भूमिकेत अंतर
मात्र, यावेळी ट्रम्प यांनी चीन आणि भारत या दोन्ही देशांचा उल्लेख केल्याने त्यांच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या भूमिकांमधील अंतरही स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत त्यांची भूमिका भारताच्या विरोधात अधिकाधिक कर लावण्याची होती. मात्र, चीनसंबंधी त्यांनी मौन बाळगले होते. त्यांनी भारतावर 50 टक्के, तर चीनवर 30 टक्के कर लावला आहे. पण युरोपियन देशांनी चीन आणि भारत या दोन्ही देशांवर 100 टक्के कर लागू करावा असे त्यांचे म्हणणे आहे.
रशियाशी बोलणार
ट्रम्प यांनी भारत आणि चीनसंबंधी युरोपियन देशांकडे करांचा आग्रह धरला असला, तरी आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या आठवड्याच्या शेवटी, किंवा पुढच्या आठवड्यात ही चर्चा करण्याचा आपला विचार आहे, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी वार्तालाप करताना प्रतिपादन केले आहे. रशियाला युद्ध थांबविण्याचा सल्ला ते देतील, अशी शक्यता या संभाव्य चर्चेसंबंधात व्यक्त केली जात आहे.
अलास्का चर्चेचे काय झाले…
ट्रम्प आणि पुतीन यांच्यात गेल्या महिन्यात अमेरिकेतील अलास्का येथे प्रत्यक्ष चर्चा झाली होती. त्या चर्चेत पुतीन यांनी युद्ध थांबविण्यासाठी काही अटी पुढे केल्या होत्या, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रशियाने युव्रेनचा जो भाग आतापर्यंत जिंकला आहे, तो रशियाकडेच राहील, ही मुख्य अट होती, अशीही माहिती सूत्रांनी दिली होती. तसेच युक्रेनला नाटोचा सदस्य करुन घेऊ नये आणि नाटो देशांनी युक्रेनमध्ये सैन्य नियुक्त करू नये, अशाही त्यांच्या अटी होत्या. चर्चा सकारात्मक झाल्याचे दोन्ही देशांनी प्रतिपादन केले होते. तथापि, पुढे प्रत्यक्षात या चर्चेचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. तसेच, रशियाचे युक्रेनवर आणि युव्रेनचे रशियावर हल्ले होतच आहेत. आता ट्रम्प पुन्हा एकदा पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेचे फलित सकारात्मक आल्यास आणि युद्ध थांबविण्यात ही चर्चा यशस्वी ठरल्यास ते जगाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे.
युरोपला सुरक्षेची चिंता
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे, ही युरोपचीही इच्छा आहे. तथापि, रशियाच्या काही अटी नाटोला मान्य नाहीत. रशिया युरोपवर हल्ला करु शकतो, अशी चिंता या देशांना भेडसावत आहे. त्यामुळे युद्ध थांबविण्याची चर्चा करताना युरोपच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर रशियाकडून हमी घ्यावी, असा या देशांचा अमेरिकेला आग्रह आहे. अशाप्रकारे युरोप, अमेरिका, रशिया आणि युव्रेन यांच्यात एक विशिष्ट प्रकारचे तणावयुक्त संबंध निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामुळे मधल्यामध्ये भारताची कोंडी होत आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारतावर कर लावून रशियाला युद्धापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही, ही बाब अमेरिका आणि युरोप यांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.









