उपाययोजनांवर होणार चर्चा
प्रतिनिधी / पणजी
चीनसह जगभरात वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमानाची गंभीर दखल गोवा सरकारने घेतली असून त्यावर उपाययोजना करण्याच्या हेतूने आज शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी आरोग्य विभागासह इतर संबंधित खात्यांची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलावली आहे. सध्या नाताळ, नववर्ष 2023 चा धुमधडाका चालू असून पर्यटकांची मोठी गर्दी होणार असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.
मागची दोन वर्षे म्हणजे 2020 व 2021 मध्ये देशासह गोव्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तो सातत्याने कमी – जास्त होत होता आणि त्यात हजारोंचे बळी गेले होते तर लाखो लोक कोरोनाने बाधित झाले होते. त्यातील अनेकजण सुदैवाने बरे झाले परंतु काही जणांना प्राण गमवावे लागले. देशासह गोव्यातही दोन – तीन वेळा लॉकडाऊन करावे लागले. दुकाने, वाहतुकीची वेळ मर्यादित करावी लागली होती. आता पुन्हा तेच दिवस परत येणार की काय? अशी धाकधुक सुरु झाली आहे.
कोरोना रोखण्यासाठी काय करायचे हे या महत्त्वाच्या बैठकीत ठरणार आहे. गोव्यात विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे जरुरीचे ठरणार आहे.









