भारतीय जनता पक्षाकडून आयोजन, लोकसभा निवडणुकीचे धोरण ठरणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रात सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत 18 जुलैला होणार आहे. या बैठकीचे आयोजन भारतीय जनता पक्षाने केले असून त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधीचे धोरण ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच आणखी काही पक्ष या आघाडीत समाविष्ट करुन घेतले जाण्याचीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दिल्लीतील अशोका हॉटेलात ही बैठक होणार आहे. रालोआने आता आपला आणखी विस्तार करण्याचे ठरविलेले आहे. त्यानुसार या आघाडीपासून काही वर्षांपूर्वी दूर गेलेल्या पक्षांशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लोकजनशक्तीपक्षाचे चिराग पासवान, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू आणि अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल या बैठकीला येण्याची शक्यता आहे.
दोन्ही बाजूंकडून सज्जता
विरोधी पक्षांनीही एकत्र येण्यासाठी कसून प्रयत्न सुरु केले आहेत. नुकतीच पाटणा येथे 15 विरोधी पक्षांची बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही आता आपली बाजू अधिक भक्कम करण्याच्या दिशेने पावले टाकावयास प्रारंभ केलेला आहे.
बैठकीत काय होणार?
18 जुलैला आयोजित करण्यात आलेल्या रालोआच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीची सज्जता करण्याच्या दृष्टीने धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिकृतरित्या या बैठकीची कार्यक्रमपत्रिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. तथापि, रालोआतील प्रत्येक पक्षाचे मत जाणून घेतले जाईल. कोणत्या पक्षाने कोठे आणि किती जागा लढवायच्या, यावर या बैठकीत विचार होण्याची शक्यता नाही. नंतरच्या बैठकांमध्ये हा मुद्दाही विचारार्थ येणार आहे.
कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे सर्व राष्ट्रीय महासचिव आणि प्रदेशाध्यक्ष येतील अशी सूत्रांची माहिती आहे. तसेच रालोआत असलेल्या सर्व पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.
बैठकीचे महत्त्व
ही बैठक धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाची मानण्यात येत आहे. कोणताही निश्चित निर्णय होण्याची शक्यता नसली, तर लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी निर्माण करण्याचा प्रारंभ करण्यात येईल. तसेच रालोआच्या सर्व सदस्य पक्षांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात येईल. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठविलेल्या अहवालांवरही विचार होऊ शकतो. विरोधी पक्षांच्या तुलनेत रालोआ कोठे आणि किती प्रमाणात प्रबळ आहे, याचाही उहापोह केला जाण्याची शक्यता आहे.









