खासदार जगदीश शेट्टर यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासाठी महत्त्वाची बैठक येत्या मार्चमध्ये होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून केवळ 112 एकर जमीन महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्यक्षात मात्र 500 ते 600 एकर जागेमध्ये सिव्हिल एरिया असल्याने या जागेची मागणी आपण संरक्षण मंत्रालयाकडे केल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. केवळ 112 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटचा असल्याने उर्वरित जागेतील नागरिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने सर्वेक्षण करून हा अहवाल राज्य सरकारला पाठवायचा आहे. राज्य सरकार संबंधित अहवाल केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाला पाठविणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे. मार्च महिन्यात जिल्हास्तरीय बैठक होणार असून यामध्ये विविध विभागांना चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे. यावेळी कॅन्टोन्मेंटबाबतही महत्त्वाची चर्चा होणार आहे. शहरातील तीन रस्ते संरक्षण मंत्रालयाने अडविले आहेत. यामुळे नागरिकांना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले जाणार असून हे रस्ते खुले झाल्यास नागरिकांची सोय होणार आहे. यासंदर्भात आपण आर्मी कमांडंटसोबत चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसला तत्वत: मान्यता
बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. धारवाड ते बेळगावपर्यंतचे वेळापत्रक निश्चित केले जात आहे. गरज भासल्यास या वेळापत्रकात बदल केला जाणार असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले.









