दर महिन्याला गाळ धरणातून सोडला जाणार
भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील सलाल आणि बगलिहार धरणांचे मासिक फ्लशिंग सुरू करण्याची योजना आखली आहे. हा निर्णय पहलगाम हल्ल्यानंतर घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या विरोधात एक रणनीतिक प्रत्युत्तर म्हणून भारताच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. केंद्रीय जल आयोगाने चिनाब नदीवरील सलाल (690 मेगावॅट) आणि बगलिहार (900 मेगावॅट) धरणांचे फ्लशिंग आता दर महिन्याला नियमित स्वरुपात करण्याची शिफारस केली आहे.
काय आहे फ्लशिंग?
फ्लशिंगचा अर्थ धरणांच्या जलाशयामध्ये साचलेला गाळ वेगवान प्रवाहाच्या माध्यमातून बाहेर काढणे आहे. हा गाळ जलाशयांची क्षमता कमी करतो आणि टर्बाइनांची कार्यक्षमता घटवितो, यामुळे जलविद्युत निर्मिती प्रभावित होते. नियमित फ्लशिंगमुळे जलाशयांची संग्रहण क्षमता बहाल होते आणि जलविद्युत निर्मितीत स्थिरता येते.
7.5 मिलियन क्यूबिक मीटर गाळ
मे महिन्याच्या प्रारंभी सुरू करण्यात आलेल्या या फ्लशिंग प्रक्रियेदरम्यान सलाल आणि बगलिहार जलाशयांमधून 7.5 दशलक्ष क्यूबिक मीटरपेक्षा अधिक गाळ बाहेर काढण्यात आला. सलाल आणि बगलिहारमध्ये अशाप्रकारची सफाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलाल धरणाची निर्मिती 1987 मध्ये झाली होती. तर बगलिहारची निर्मिती 2008-09 मध्ये झाली होती.
पाकिस्तानचा आक्षेप अन् भारताची भूमिका
सिंधू जल कराराच्या अंतर्गत पाकिस्तानने भूतकाळात फ्लशिंग प्रक्रियांवर वारंवार आक्षेप घेतला होता. फ्लशिंगदरम्यान पाणी सोडण्यात येत असल्याने सखल भागांमधील पातळी वाढू शकते, तर जलाशयाला पुन्हा भरण्याच्या प्रक्रियेनंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परंतु करार स्थगित केल्याने पाकिस्तानला आता कुठल्याही प्रकारची माहिती पुरविली जाणार नाही तसेच फ्लशिंगपूर्वी त्याला कळविले जाणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
नव्या प्रकल्पांना मिळणार वेग
पाकिस्तानच्या आक्षेपांमुळे रोखण्यात आलेल्या प्रकल्पांना आता भारत वेग देणार आहे. यात पकल डुल (1 हजार मेगावॅट), किरु (624 मेगावॅट), क्वार (540 मेगावॅट) आणि रैतल (850 मेगावॅट) प्रमुख आहे. हे सर्व प्रकल्प चिनाब नदीवरील आहेत.









